नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 09:09 PM2018-12-10T21:09:05+5:302018-12-10T21:12:25+5:30
महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालून पोलीस ठाण्यातील गोंधळाचे मोबाईलमध्ये शुटिंग करणे डॉक्टर आणि त्यांच्या दोन भावाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या तिघांनाही शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालून पोलीस ठाण्यातील गोंधळाचे मोबाईलमध्ये शुटिंग करणे डॉक्टर आणि त्यांच्या दोन भावाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या तिघांनाही शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.
सूर्यकांत यज्ञनारायण द्विवेदी (वय ३०) हे गोधनी मार्गावरील डोळे ले-आऊटमध्ये राहतात. मानकापूर पोलिसांच्या माहितीनुसार ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. घरगुती वादामुळे त्यांची पत्नी रविवारी दुपारी मानकापूर पोलीस ठाण्यात आली. पत्नीच्या मागेच सूर्यकांत तसेच दीपक (वय २६) आणि ओम यज्ञनारायण द्विवेदी (वय २४) हे दोन भाऊ देखील पोलीस ठाण्यात आले. तेथे त्यांचा आपसात वाद सुरू झाला. ते मोठमोठ्याने बोलत असल्याने दिवसपाळी अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक योगिता राम श्रीखंडे यांनी त्यांना ओरडू नका, असे म्हणत रागावले. श्रीखंडेपाठोपाठ ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनीही ठाण्यात वाद घालू नका, असे म्हणत त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्याने अपमानित झाल्याची भावना झाल्यामुळे द्विवेदी बंधूंची श्रीखंडे तसेच ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. पोलीस विनाकारण अपमान करीत असल्याचे पाहून दीपक यांनी आपला मोबाईल काढून घटनाक्रमाचे शुटिंग सुरू केले. ते पाहून उपनिरीक्षक श्रीखंडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून द्विवेदी बंधूंना आवरले. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.