गोंधळ घालणाऱ्या मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:29 PM2019-09-19T23:29:18+5:302019-09-19T23:30:40+5:30
येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे.
मृत अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील आहे. ताजुद्दीन बाबा दर्गाह परिसरात मंगळवारी सायंकाळी ६. ४० वाजता ही व्यक्ती आरडाओरड करीत होती. दगड मारून गोंधळ घालत होती. ही माहिती कळाल्याने सक्करदरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. तेथेही पोलिसांना शिवीगाळ करून अंगावर धावण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी मेडिकलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, सक्करदरा पोलिसांनी मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मनोरुग्णालय प्रशासनाने त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात नेले. तो सारखी शिवीगाळ आणि आरडाओरड करीत होता. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यासमोर त्याने असे वर्तन करू नये म्हणून पोलिसांनी त्याला व्हॅनमध्ये बसवून ठेवले अन् न्यायालयात कागदपत्रे तयार करू लागले. तो व्हॅनमध्ये झोपल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. काही वेळेनंतर त्याला पोलिसांनी उठविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो निपचित पडून होता. परिणामी हादरलेल्या पोलिसांनी त्याला दुपारी ४.३५ वाजता मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी मनोरुग्णाला तपासून मृत घोषित केले. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मनोरुग्णाचा मृत्यू नेमका कसा झाला, तो नैसर्गिक आहे की मारहाणीमुळे त्याबाबत उलटसुलट चर्चा असून, वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. वैद्यकीय अहवालानंतर मनोरुग्णाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सक्करदरा पोलीस सांगत आहेत.
सीआयडी करणार तपास
पोलिसांच्या ताब्यात असताना कुणाचा मृत्यू झाल्यास (कस्टडी डेथ) त्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अण्वेषण (सीआयडी) कडे सोपविला जातो. हे प्रकरण असेच आहे. मनोरुग्णाचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचा तपास सीआयडी करणार आहे. सक्करदरा पोलिसांनी त्यासंबंधाने गुरुवारी वरिष्ठांकडे कागदोपत्री माहिती दिली आहे. तत्पूर्वी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निर्देशानुसार शवविच्छेदन करण्यात आले.