रॅगिंगमुळे त्रस्त विद्यार्थ्याने घेतली तलावात उडी; पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 08:13 PM2022-01-01T20:13:11+5:302022-01-01T20:14:00+5:30
Nagpur News वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने नागपुरात एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले.
नागपूर - वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली.
१५ वर्षांचा हा मुलगा सुभाषनगरात राहतो. तो नववीचा विद्यार्थी आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. अन्य मुलांसारखे शान शाैकीचे जीवन जगता येत नाही म्हणून आधीच नैराश्याने घेरलेल्या या विद्यार्थ्याला त्याचे वर्गमित्र छळत होते. ‘तू शारिरिकदृष्ट्या सक्षम नाही’ असे म्हणून त्याला टोचून बोलत होते. त्याला वेगवेगळ्या शारिरिक कसरती करायला लावत होते. वर्गमित्रांच्या या छळामुळे तो कंटाळला होता. कमजोर असल्याची भावना त्याच्या मनात खोलवर रुजली. त्यामुळे त्याला नैराश्याने घेरले. या स्थितीत आत्महत्येचा विचार करून शनिवारी सकाळी तो घराबाहेर पडला. अंबाझरी तलावावर पोहचल्यानंतर त्याने पाण्यात झोकून दिले.
दरम्यान, यावेळी तलावावर अंबाझरी ठाण्याचे पोलीस शिपायी आशिष जाधव आणि महापालिका कर्मचारी प्रितेश टेंभूर्णे या दोघांनी प्रसंगावधान दाखवत लगेच तलावात उडी घेतली आणि त्याला पाण्याबाहेर काढला. प्रथमोपचार केल्यानंतर तो सुखरूप असल्याचे आशिष आणि प्रितेशच्या लक्षात आले. त्यानंतर मुलाला अंबाझरी ठाण्यात नेण्यात आले. ठाणेदार डॉ. अशोक बागुल यांनी मुलाची वास्तपुस्त केल्यानंतर त्याला आत्महत्येचे कारण विचारले. बराच वेळ अबोल राहिल्यानंतर अखेर त्याने आत्महत्येमागचे कारण सांगितले. वर्गमित्रांचे चिडविणे असह्य झाल्याचेही सांगितले. ठाणेदार बागुल यांनी त्याचे समुपदेशन करत त्याच्या वडिलांना बोलवून घेतले. त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन मुलाला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
त्याला मानसिक आधाराची गरज
वर्गमित्रांच्या चिडविण्याचा या मुलावर एवढा खोलवर प्रतिकूल परिणाम झाला आहे की त्याने ‘आज वाचविले उद्या काय’ असा प्रश्न पोलिसांना केला. त्याच्या या प्रश्नामुळे त्याला प्रभावी समुपदेशनासोबतच भक्कम मानसिक आधाराचीही गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन आठवड्यात दुसरी घटना
तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वाचविण्याची अंबाझरीतील दोन आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आईच्या मृत्युमुळे प्रचंड अस्वस्थ असलेल्या एका तरुणाने अशाच प्रकारे तलावात उडी घेतली होती आणि अंबाझरी पोलिसांनी त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढून त्याचा जीव वाचविला होता.
----