Corona Virus in Nagpur; भंगार वेचणाऱ्यांनी धरली भिकेची झोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:44 AM2020-04-16T09:44:16+5:302020-04-16T09:57:13+5:30
भंगाराच्या भरवशावर दोन वेळची भाजी-भाकरी मिळविणाऱ्या भंगार वेचणाऱ्यांवरही चक्क भीक मागण्याची पाळी आली आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंगावर मळकट कपडे आणि पाठीवर रस्त्यावर पडलेले साहित्य गोळा करण्यासाठी झोळी, असा भंगार वेचणाऱ्यांचा पेहराव. शहरात गल्लोगल्लीत, कचराकाडीत फिरून प्लास्टिक, काचेच्या बॉटल्स, पेपर व लोखंड साहित्याचे तुकडे गोळा करणे, हे त्यांचे नित्यकर्म. मात्र कोरोनाच्या धास्तीने त्यांच्या कामावर गदा आणली आहे. भंगाराच्या भरवशावर दोन वेळची भाजी-भाकरी मिळविणाऱ्या भंगार वेचणाऱ्यांवरही चक्क भीक मागण्याची पाळी आली आहे. दिघोरी उड्डाणपुलाकडून मानेवाडा रिंग रोडकडे जाताना मोठ्या प्रमाणात असलेल्या भंगार खरेदीदारांकडे सध्या शुकशुकाट पसरला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसायही ठप्प पडला आहे. पण या परिस्थितीचा परिणाम गल्लोगल्ली भंगार वेचणाऱ्या गरीब लोकांवर पडला आहे. रिंग रोडच्या झोपडपट्ट्यांसह शताब्दी चौकासमोरच्या रहाटेनगर टोली वस्तीत या लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. सकाळी उठताच खांद्यावर मोठी झोळी टांगून यांची शहरात भटकंती सुरू होते. प्लास्टिक पन्नी, बाटल्या, भंगार वेचण्याचे काम करतात. भंगार हेच त्यांच्या उदरनिवार्हाचे साधन. असे जगताना कुणासमोर हात पसरायचे नाही, हा त्यांचा स्वाभिमान. मात्र कोरोना प्रकोपामुळे त्यांच्यावर आज हात पसरण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे भंगार खरेदीची दुकाने बंद झाली आहेत. शिवाय कचºयातून कोरोना आजार पसरतो, ही धास्ती आणि पोलीस कारवाईची भीती यामुळे त्यांनी भंगार वेचण्याचे काम बंद केले. १९ मार्चपासूनच त्यांचे हे काम बंद झाल्याचे माया नामक महिलेने सांगितले. बहुतेक पुरुष आणि स्त्रियांनाही कुठले ना कुठले व्यसन. घरी साठविलेला पैसा अडका किंवा धान्य असे काहीच नाही. त्यामुळे चक्क उपासमारीची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे या महिला आता शहरातील विविध वस्त्यांमध्ये फिरून तांदूळ आणि गहू मागण्यासाठी फिरत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे या महिलांना बहुतांश लोक दारात उभेही करीत नाहीत. काही स्वयंसेवी संस्थांद्वारे अन्नदान केले जाते आणि हेच त्यांच्यासाठी आधार होत असल्याचे मायाने सांगितले. मात्र अनेकांकडून त्यांची हेटाळणी मिळत असल्याचे तिने सांगितले. मात्र, पोट भरण्यासाठी त्या प्रत्येक दारावर जाऊन आवाज देतात. त्यांचे दारोदार फिरणेही धोक्याचे आहे. त्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही अडवले नाही, असे त्यांच्यापैकी एका महिलेने सांगितले. भंगारातून मिळणारे रोख पैसे दैनंदिन व्यवहारासाठी उपयोगी पडायचे. ते मिळणे आता बंद झाले आहे. यामुळे भंगार गोळा करण्याऐवजी आता भिकेची झोळी घेऊन कोरोनाने आलेल्या परिस्थितीशी झगडत आहेत.
अनेक कुटुंबांचे हाल
मायाला दोन मुले आहेत. तिच्यासोबतची मंदा तीन मुलींची आई आहे. आलेल्या परिस्थितीमुळे अनेकदा उपाशी राहण्याची पाळी येते. मुलांचेही हालहाल होत आहेत. त्यामुळे भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले. कधी कधी रस्त्यावर उभे असताना कुणाकडून तरी तांदूळ व इतर धान्य मिळाले. परंतु तेल, मिठासाठी पैसे हवेत. मुलाबाळांना लागणाऱ्या वस्तूंसाठी पैसे हवे म्हणून भीक मागण्याचा पर्याय निवडल्याचे त्या म्हणाल्या.
- लोक दारापुढे येऊ देत नाहीत. पूर्वी गल्ल्यात फिरताना कुणीही रोखत नव्हते. आता मात्र फिरताना दिसले की जोरात ओरडतात. कोणत्या तरी आजाराच्या (कोरोना) भीतीने लोक त्यांच्या दारापुढे गेलो की खेकसतात, पळवून लावतात; मात्र काही लोक दया करून काही खायला देतात किंवा धान्यही देतात. इतक्या वर्षात कधी अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे या महिलांनी आवर्जून सांगितले.