पवारच अध्यक्ष असावे, अशी राहुल गांधींचीही इच्छा; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
By कमलेश वानखेडे | Published: May 4, 2023 05:07 PM2023-05-04T17:07:00+5:302023-05-04T17:07:15+5:30
पटोले गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीने पक्षांतर्गत निर्णय घेतला.
नागपूर :राष्ट्रवादीमध्ये जे काही चालले आहे त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खा. सुप्रिया सुळे यांना फोन केला. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असल्यामुळे विचारपूस करणे स्वाभाविक आहे. पवार हे अनुभवी राजकारणी आहेत. ते अजूनही पदावर राहिले पाहिजे, अशी भूमिका राहुल यांनी मांडली, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
पटोले गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीने पक्षांतर्गत निर्णय घेतला. त्यांच्या पक्षातील निर्णयासाठी त्यांनी आमच्यासोबत बोलण्याची गरज नाही. कुणाला अध्यक्ष बनवावे हा त्यांचा निर्णय आहे. काहिही झाले तकरी आमची वज्रमुठ सैल होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष आहे, त्यामुळे ते भाजप सोबत जाणार नाही, असा दावाही पटोले यांनी केला.
अदानींबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट
- अदानींबाबत काँग्रेस ची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी चे अदानी सोबत काय संबंध आहे, याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही. अदानी ने जो घोळ केला हे सर्वांना माहीत आहे, अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध काय, एवढेच राहुल गांधी यांनी विचारले तर त्यांची खासदारकी काढून टाकली, असा आरोप पटोले यांनी केला.
केंद्राकडून महाराष्ट्राचे लचके तोडले जात आहे
- शरद पवार यांनी काय लिहावे व काय बोलावे हा त्यांच्या प्रश्न आहे. त्यांच्यावर काही बोलायचे नाही, हे आमचे ठरले आहे. पण महाराष्ट्राचे लचके केंद्राकडून तोडले जात आहेत. मुंबईचा व्यापार सूरतला नेण्याचा डाव सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणे सुरू आहे. महाराष्ट्र बर्बाद करण्याची योजना आहे, असा आरोपही त्यांनी केला.