राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात खरे अच्छे दिन येणार; अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:39 PM2017-12-11T21:39:34+5:302017-12-11T21:39:54+5:30
काँग्रेसच्या पंरपरेला साजेसे नेतृत्व राहुल गांधी यांच्या रूपाने देशाला मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन प्राप्त होतील, असा ठाम विश्वास राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : काँग्रेस पक्षाच्या १३२ वर्षांच्या इतिहासात प्रत्येक काँग्रेस अध्यक्षांनी केवळ पक्षहिताकरिताच नाही तर देशहितासाठी भरीव योगदान दिले आहे. प्रत्येकाचे जीवन देशासाठी समर्पित राहिले आहे. काँग्रेसच्या पंरपरेला साजेसे नेतृत्व राहुल गांधी यांच्या रूपाने देशाला मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन प्राप्त होतील, असा ठाम विश्वास राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
चव्हाण म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांकरिता आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे. देशाची सर्वांगीण प्रगती साधत देश घडवण्याचे काम काँग्रेसच्या नेतृत्वाने केले आहे. या महान परंपरेला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व राहुल गांधी यांचे असून देशाला प्रामाणिक नेता मिळाला आहे. सद्यस्थितीत राजसत्तेवर जनतेची दिशाभूल करणारे, धादांत खोटे बोलणारे नेतृत्व आहे. या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडण धोक्यात आली असून देशाचा नैतिक पाया ढासळत चालला आहे. सत्तेकरिता स्वप्ने विकणे, खोटी आश्वासने देणे हे प्रकार सर्रास सुरू असून देशातील सर्वोच्च पदाचा आब देखील दुर्दैवाने राखला जात नाही. राहुल गांधी यांच्या रूपाने या आव्हानांना सक्षमपणे तोंड देणारे सर्व जाती, धर्म आणि समाजील सर्व घटकांना बरोबर घेऊन नेहमीच जन की बात करणारे नेतृत्व मिळाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, सामाजिक मूल्ये अधिकाधिक मजबूत होतील आणि देशाच्या सामाजिक एकतेवर घाला घालणाऱ्या विचारधारेचा बीमोड करण्याकरिता काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिशी राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली : विखे पाटील
- राहुल गांधी एक खंबीर नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मजबुती देण्यासाठी ते देशभर फिरत आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आदी समाजघटकांबाबत ते कमालीचे संवेदनशील असून, याच घटकांना केंद्रिभूत ठेवून ते काम करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील उपेक्षित, मागास व वंचित घटकांचा आवाज अधिक बुलंद होईल. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने देशातील तरुणाईमध्ये उत्साह संचारला असून, कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.