राहुल गांधींकडून गंभीर दखल
By admin | Published: February 12, 2017 02:14 AM2017-02-12T02:14:37+5:302017-02-12T02:14:37+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरील शाईफेक प्रकरणाची अ.भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरील शाईफेक प्रकरणाची अ.भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी चव्हाण यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला. घटनेची एकूणच माहिती घेत सुखरूपतेबद्दल विचारपूस केली. या वेळी राहुल गांधी यांनी संबंधित घटनेमागील सूत्रधारावर कडक कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांना आश्वस्त केले. महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांनीही चव्हाण यांना फोन करून माहिती घेतली. तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस शनिवारी उफाळून समोर आली. हसनबाग येथील प्रचार सभेत नाराज कार्यकर्त्याने माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकली. हे कृत्य घडले तेव्हा काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. गटबाजीतून उद्भवलेला वाद एवढ्या विकोपाला जाईल, असे कार्यकर्त्यांना वाटले नव्हते. माथाडी कामगारांचा नेता व काँग्रेस कार्यकर्ता असलेला ललित बघेल याने चव्हाण यांच्यावर शाई फेकली. बघेल याला चोप देऊन कार्यकर्त्यांनी शाईच्या प्रत्येक थेंबाचा हिशेबही घेतला. मात्र, या प्रकारामुळे काँग्रेसमधील वाद उफाळून आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारावर चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया गटबाजीबद्दल उद्विग्नता व्यक्त करणारी दिसली. बघेल हा एका मोठ्या काँग्रेस नेत्याचा कार्यकर्ता आहे, अशी एकच चर्चा घटनास्थळी रंगली होती. या घटनेला काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचे पाठबळ असल्याचा दावाही काही कार्यकर्ते करीत होते. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे, बघेल याचे कुणाशी धागेदोरे आहेत याचा तपास आता काँग्रेस पदाधिकारी घेत आहेत. या प्रकरणी सूत्रधार नेत्यावरही पक्षातर्फे कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.