सोनपापडी कारखान्यावर छापा १०८ किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:30 PM2019-09-25T23:30:44+5:302019-09-25T23:31:34+5:30
वैशाली नगर येथील जय दुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी छापा घालून १०८ किलो प्लाटिक जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैशाली नगर येथील जय दुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी छापा घालून १०८ किलो प्लाटिक जप्त केले.
वसंत गुप्ता यांचा हा कारखाना आहे. त्यांच्या विरोधातील ही तिसरी कारवाई असल्याने २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. नियमानुसार त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली जाणार आहे. आसीनगर झोन क्षेत्रात हे प्रतिष्ठान असल्याने झोन कार्यालयाला तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे व आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्या नेतृत्वात शहरात प्लास्टिक विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी गांजाखेत येथील गोदामावर छापा घालून सहा टन माल जप्त केला होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी आसीनगर झोन क्षेत्रात कारवाई करण्यात आल्याने प्लास्टिक विके्र त्यांत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैशालीनगर येथील इंदौर फूड प्रॉड्क्ट यांच्या विरोधात ९ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली कारवाई करण्यात आली होती. कारवाईत १.१३० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. पहिल्या वेळी ५ हजार दंड आकारण्यात आला होता. दुसऱ्यांदा वसंत गुप्ता यांच्या जयदुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर १२ मार्च २०१९ रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३.५०० किलो प्लास्टिक जप्त करून १० हजारांचा दंड आकारण्यात आला होता.
राज्यात प्लास्टिक वर बंदी घातल्यानंतर उपद्रव शोध पथकाने २३ जून २०१८ ते २३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ९४२ ठिकाणी कारवाई करून ४७.३० लाखांचा दंड वसूल केला. ९४ प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यात आल्या.२६६९१ दुकानांची तपासणी करण्यात आली. एकूण २१९०१.९२० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.