नागपुरात भेसळ करणाऱ्या १८ दुकानांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:25 AM2020-04-01T00:25:56+5:302020-04-01T00:27:43+5:30
इतवारी, मस्कासाथ या व्यावसायिक भागातील १८ दुकानांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी मंगळवारी धाडी टाकून करून ३३ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी, मस्कासाथ या व्यावसायिक भागातील १८ दुकानांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी मंगळवारी धाडी टाकून करून ३३ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला.
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी १७ नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले. मस्कासाथ रेशीमओळ येथील मधुसूुदन ट्रेडर्स या दुकानात जून २०१९ ला मुदत संपलेल्या रिफाईन सूर्यफूल खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे आढळून आले. हे तेल हानीकारक असून आणि शरीरासाठी अपायकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाची वाढती मागणी पाहता या दुकानदाराने गोदामातील माल विक्रीस बाहेर काढला होता. या दुकानातून २८ हजार रुपये किमतीचे २५८ किलो खाद्यतेल जप्त केले. तर मस्कासाथ, इतवारी येथील राम ट्रेडर्समधून निकृृष्ट दर्जाचे मिरची आणि हळदी पावडर ताब्यात घेतले. या दुकानातून अधिकाऱ्यांनी दोन नमुने घेतले आणि अंदाजे ५ हजार रुपये किमतीचे २८ किलो मिरची व हळद पावडर जप्त केले. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वात आणि अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली. देशपांडे म्हणाले, व्यापारी अन्नपदार्थांमध्ये भेसळ आणि जास्त भावात विकत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत. त्या आधारे विभागाने मंगळवारी कारवाई केली. विभागाची निरंतर तपासणी सुरूच आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न विभागातील अधिकारी औषधी प्रशासन विभागाला मास्क आणि सॅनिटायझरच्या तपासणीसाठी मदत करीत आहेत.
एनजीओला विभागाचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था गरीब आणि गरजूंना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत. ही चांगली बाब आहे. पण वस्तूंचे पॅकिंग करताना जागा स्वच्छ आणि हायजेनिक आहे किंवा नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. कुणाला विषबाधा होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. पॅकिंग करणाऱ्या जागांची माहिती द्यावी, जेणेकरून विभागाचे अधिकारी पाहणी करतील, असे देशपांडे म्हणाले.