कामठीतील बाेगस रुग्णालयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:20+5:302021-05-07T04:09:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील सैलाब नगरात धर्मादाय दवाखान्यावर धाड टाकून पाेलिसांनी रुग्णांवर औषधाेपचार करीत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील सैलाब नगरात धर्मादाय दवाखान्यावर धाड टाकून पाेलिसांनी रुग्णांवर औषधाेपचार करीत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या बाेगस डाॅक्टरला अटक केली. त्याच्याकडून औषधे, ऑक्सिजन सिलिंडर व इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी (दि. ६) दुपारी करण्यात आली. विशेष म्हणजे, त्याच्याकडे वैद्यकीय शाखेची पदवी अथवा पदविका तसेच वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
चंदन नरेश चाैधरी (४५) असे अटक करण्यात आलेल्या बाेगस डाॅक्टरचे नाव आहे. त्याने कामठी शहरातील सैलाब नगरातील ड्रॅगन टेम्पल पॅलेसच्या प्रवेशद्वाराजवळ धर्मादाय दवाखाना सुरू केला हाेता. या दवाखान्यात ताे रुग्णांवर ॲलाेपॅथी उपचार करायचा. ताे रुग्णांची फसवणूक करीत असल्याची तक्रार तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे करण्यात आली हाेती. त्या अनुषंगाने वैद्यकीय, महसूल व पाेलीस विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी त्याच्या दवाखान्यात धाड टाकून कसून तपासणी केली.
यात त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे वैद्यकीय व्यवसाय प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. शिवाय, ताे याेगा तसेच आयुर्वेद पंचकर्म व नॅचराेपॅथीच्या नावाखाली रुग्णांवर ॲलाेपॅथी उपचार करून त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचेही चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला लगेच ताब्यात घेत अटक करण्यात आली. शिवाय, त्याच्याकडून ॲलाेपॅथीची वेगवेगळी औषधे, गर्भपाताची औषधे, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन फ्लाेमीटर, सलाईनच्या बाटल्या, सिरिंज, निडल्स व इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले.
ही कारवाई कामठी नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. शबनम खानुनी, नायब तहसीलदार रणजित दुसावार, सहायक पाेलीस निरीक्षक कन्नाके, पाेलीस उपनिरीक्षक वारंगे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.