नागपूरच्या वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्सवर छापा : २२५ पोती सडकी सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:29 AM2018-10-14T00:29:59+5:302018-10-14T00:30:34+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती.
भांडेवाडीतील अंतुजीनगरात (रेल्वे स्थानकाजवळ) रवी अशोक निंदेकर राहतो. त्याचे स्मॉल फॅक्टरी एरिया, वर्धमाननगरात भगवान ट्रेडर्स आहे. तेथे लाखोंची सडकी सुपारी ठेवली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांना गुरुवारी मिळाली. त्यांनी लगेच गुन्हे शाखेचे पथक तेथे पाठविले. या पथकाने भगवान ट्रेडर्सवर छापा घालून तेथे ठेवलेली २२५ पोती सडकी सुपारी ताब्यात घेतली. आरोग्याला घातक असलेली ही सुपारी गंधक आणि रासायनिक पदार्थांमध्ये मिक्स करून ती भट्टीत ठेवली जाते. त्यानंतर ही सुपारी फुगून टणक आणि पांढरी बनते. तीच सुपारी बाजारात विकून लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो. नागपुरात गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असून, अन्न व औषध प्रशासनातील काही भ्रष्ट मंडळींचा या गोरखधंद्याला आश्रय आहे. त्यामुळे समाजकंटक रोज हजारो पोती सडकी सुपारी पांढरी करून मध्य भारतात विकतात. गुन्हे शाखेच्या पथकाने मात्र तेथे छापा घालून अन्न सुरक्षा अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही तेथे बोलवून घेतले. त्यांना पुढची कारवाई सोपविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. डोर्लीकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिर्के, हवालदार धर्मेंद्र सरोदे आणि विजय साळवे यांनी ही कामगिरी केली.