नागपुरात बड्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:46 AM2018-01-13T00:46:31+5:302018-01-13T00:50:07+5:30
वर्धमाननगरातील एका अपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा घातला.
लोकमत न्यून नेटवर्क
नागपूर : वर्धमाननगरातील एका अपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा घातला. तेथे सिडनी विरुद्ध पर्थ दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या एका बुकीला पोलिसांनी अटक केली.
योगेश ऊर्फ जग्गू बेलाराम सेवानी (वय ३४) असे बुकीचे नाव आहे. तो जीवनधारा अपार्टमेंट, वर्धमाननगरात राहतो. तो क्रिकेट सामन्यावर बेटिंग करतो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी योगेश आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिगबॉस २०-२० क्रिकेट सिरीजच्या सिडनी विरुद्ध पर्थ सामन्यावर सट्टा घेत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर, उपनिरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.