नागपुरातील चील एन ग्रीलवर छापा : बारपुढे बीअर विकत होते कर्मचारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 09:44 PM2020-04-17T21:44:56+5:302020-04-17T21:46:41+5:30

गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी रात्री सदर येथील चील एन ग्रील बारच्या कर्मचाऱ्यांना बीअर विकताना रंगेहात पकडले. हा बार सदर पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे.

Raid on Chill N Grill in Nagpur: Employees selling beer before bar! | नागपुरातील चील एन ग्रीलवर छापा : बारपुढे बीअर विकत होते कर्मचारी!

नागपुरातील चील एन ग्रीलवर छापा : बारपुढे बीअर विकत होते कर्मचारी!

googlenewsNext
ठळक मुद्देदोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी रात्री सदर येथील चील एन ग्रील बारच्या कर्मचाऱ्यांना बीअर विकताना रंगेहात पकडले. हा बार सदर पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. परिणामी, या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या कारवाईमुळे दारूची अवैध विक्री करणाऱ्या बार संचालकांचे धाबे दणाणले आहे.
बारचे कर्मचारी अरविंद तुळसीराम उमरेडकर (२६) व सागर शंकर मोईनकर (२४) यांना अटक करण्यात आली आहे. उमरेडकर इतवारी तर, मोईनकर सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी आहे. हे कर्मचारी दारू विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी यांनी सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींनी बारच्या तिसऱ्या माळ्यावर बीअरच्या बॉटल्स लपवून ठेवल्या होत्या. अबकारी विभागाने बारला सील लावले होते. ते सील तोडण्यात आले होते. पोलिसांनी या कारवाईची अबकारी विभागाला माहिती दिली. त्यामुळे अबकारी विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले होते.
आरोपींना सदर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर गुन्हा नोंदविण्यासाठी गुन्हे शाखेला घाम गाळावा लागला. सदर पोलीस गुन्हे शाखेच्या कारवाईत त्रुटी शोधत होते. बारशी जुळलेला एक पोलीस कर्मचारीही सक्रिय झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. परिणामी, सदर पोलिसांनी साथरोग कायदा व दारूबंदी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला व २३८० रुपयांची दारू जप्त केली.

लायसन्स नसताना सुरू होते मेडिकल स्टोअर्स
अवैधरीत्या बीअर विकणाऱ्या कंचन मेडिकल स्टोअर्सचा संचालक बंटी गुप्ता हा लायसन्सची मुदत जुलै-२०१९ मध्ये संपली असतानाही हे दुकान चालवीत होता. पोलिसांच्या कारवाईनंतर ही बाब पुढे आली. गुप्ताने लायसन्सचे नूतनीकरण केले नाही. एफडीएदेखील गप्प बसले होते. पोलीस कारवाईचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी हालचाल केली व गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर गुप्ताविरुद्ध औषधी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला.

मदिरा बारचे लायसन्स रद्द
अबकारी विभागाने मदिरा बारचे लायसन्स रद्द केले आहे. हा बार सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. पाच वर्षापूर्वी बार गर्ल नाचवल्यामुळे बारचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे या बारला पुन्हा लायसन्स मिळाले. त्यानंतरही बारवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती. ताज्या कारवाईनंतर गणेशपेठ पोलिसांनी बारचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस केली होती. मेयो रुग्णालय चौक काही महिन्यांपासून दारू व अमली पदार्थ तस्करीचे ठिकाण झाले आहे.

Web Title: Raid on Chill N Grill in Nagpur: Employees selling beer before bar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.