क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:08 AM2021-05-01T04:08:25+5:302021-05-01T04:08:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असतानाच कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असतानाच कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांच्या पथकाने कन्हान शहरातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. यात सट्टा स्वीकारणाऱ्या आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून राेख रक्कम व विविध साहित्य असा एकूण १ लाख ३९ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. २८) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
काेमल लक्ष्मण पांजरे (४७, रा. हनुमाननगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. काेमल हा त्याच्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा स्वीकारत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे कन्हान पाेलिसांनी बनावट ग्राहक त्याच्याकडे पाठवून चाचपणी करून घेतली असता, काेमल पांजरे हा सनरायजर हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारत असल्याचे लक्षात येताच बनावट ग्राहकाने इशारा केला आणि पाेलिसांच्या पथकाने लगेच धाड टाकली.
यात काेमल पांजरे यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १० हजार रुपयांचा टीव्ही, एक हजार रुपयांचे कॅलक्युलेटर, २१,५०० रुपयांचा सेटटाॅप बाॅक्स व चार्जर, १६ हजार रुपयांचे तीन माेबाईल हॅण्डसेट, ५०० रुपयांचे सट्टा नमूद केलेले रजिस्टर, १ लाख १० हजार रुपये राेख असा एकूण १ लाख ३९ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती परिविक्षाधीन पाेलीस उपअधीक्षक क्षीरसागर यांनी दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक मेश्राम, शिपाई कुणाल पारधी, शरद गीते, संजय बराेदिया, विशाल शंभरकर, मंगेश साेनटक्के, मुकेश वाघाडे, सुधीर चव्हाण, आतिश मानवटकर, रूपाली कुळमेथे यांच्या पथकाने केली.