नागपुरात गुन्हे शाखेचे हुक्का पार्लरवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:52 AM2018-04-03T10:52:47+5:302018-04-03T10:52:56+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे मारले. एका ठिकाणी पोलिसांना चक्क नऊ अल्पवयीन मुले-मुली हुक्का पिताना आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे मारले. एका ठिकाणी पोलिसांना चक्क नऊ अल्पवयीन मुले-मुली हुक्का पिताना आढळले.
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती मार्गावरील कोप्पा, थ्री बॅग्स, हवेली तसेच लक्ष्मीभवन चौकातील स्प्रेड आणि नाईन या हुक्का पार्लवर पोलिसांनी सोमवारी दुपारी ते सायंकाळपर्यंत छापे घातले.
भारतनगर चौकातील एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हवेली हुक्का पार्लरमध्ये पोलिसांना नऊ अल्पवयीन मुले हुक्क्याचा धूर उडवताना आढळले. पोलिसांनी तेथून हुक्का पॉट तसेच विविध प्रकारचे साहित्य जप्त केले. संचालक सुमित गोपलेविरुद्ध गुन्हा दाखल केला तर अन्य हुकका पार्लरच्या संचालकांना चालान देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. शहरात ठिकठिकाणी हुक्का पार्लर थाटले गेले असून, कारवाईनंतरही ते सुरू आहेत.
काय करतात ठाण्यातील पोलीस?
एवढ्या मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू आहेत आणि तेथे अल्पवयीन मुलामुलींच्या उड्या पडतात हे माहीत असूनही अंबाझरी पोलीस ठाण्यातील मंडळी काय करतात, ते कळायला मार्ग नाही.