तिखाडी येथील दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:52+5:302021-03-25T04:08:52+5:30
उमरेड : पोलिसांच्या पथकाने तिखाडी येथील मोहफुलाच्या दारूभट्ट्यांवर धाड टाकून एकूण १ लाख ८४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ...
उमरेड : पोलिसांच्या पथकाने तिखाडी येथील मोहफुलाच्या दारूभट्ट्यांवर धाड टाकून एकूण १ लाख ८४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात आराेपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २३) करण्यात आली.
तिखाडी येथे काही नागरिक मोहफुलाच्या हातभट्टीवर मोठ्या प्रमाणात दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या गावात पाहणी केली आणि तिथे दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. पाेलिसांना पाहून आराेपी तेथून पसार झाले. या कारवाईत पोलिसांनी दारू गाळणे व त्याची अवैध विक्री करणाऱ्या आराेपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. २,३०० लिटर मोहफूल रसायन सडवा, १४७ लिटर मोहफुलाची दारू व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणी उमरेड पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून आराेपींचा शाेध सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत साेलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक राजेश पाटील, पाेलीस उपनिरीक्षक प्रशांत खाेब्रागडे, सहायक फाैजदार ईश्वर जाेधे, हवालदार रमेशचंद्र त्रिपाठी, अरुण जयसिंगपुरे, मनाेज वाघ, राम राठाेड, गाेवर्धन सहारे, सदाम शेख यांच्या पथकाने केली.