नागपुरात एकाच वेळी चार सट्टा अड्ड्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:38 AM2018-06-29T01:38:41+5:302018-06-29T01:39:39+5:30
विविध पोलीस ठाण्यांतर्गत चालणाऱ्या सट्टा-जुगार अड्ड्यांची माहिती काढल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गुरुवारी दुपारी चार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून घेतले. या छापामार कारवाईत पोलिसांनी मटका अड्ड्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या १२ आरोपींना अटक करून रोख तसेच मटक्याचे साहित्यासह १ लाख, १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध पोलीस ठाण्यांतर्गत चालणाऱ्या सट्टा-जुगार अड्ड्यांची माहिती काढल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गुरुवारी दुपारी चार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून घेतले. या छापामार कारवाईत पोलिसांनी मटका अड्ड्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या १२ आरोपींना अटक करून रोख तसेच मटक्याचे साहित्यासह १ लाख, १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सर्वात मोठी कारवाई नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबागमध्ये झाली. या भागात कुख्यात मटका किंग इब्राहिम खान गेल्या अनेक दिवसांपासून सट्टा अड्डा चालवतो. पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावर छापा मारून तेथून मोईनुद्दीन ऊर्फ पाशा अजिमुद्दीन बब्बू चिश्ती (वय २७), सय्यद लियाकत अली सय्यद ईशरत अली (वय ३८), सिद्धार्थ हरिदास मेंढे (वय ४७), हसनशाह रहेमानशाह (वय ६७), फारूख शेख रशिद शेख (वय ४५), मोहम्मद इर्शाद अन्सारी आणि (वय २०) आणि आकाश प्रकाश पौनीकर (वय १९) या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व सट्टा पट्टीची खयवाडी करताना पोलिसांना आढळले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३,७६० रुपयांचे साहित्य जप्त केले.
अशाच प्रकारे अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मानेवाडा मार्गावरील रंजना लॉनच्या मागे सुरू असलेल्या कुख्यात चंद्रमणी हिरालाल मेश्राम (वय ४७) याच्या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथून मेश्राम आणि त्याचा साथीदार सूरज देवा सोळंकी (वय २१, रा. दोघेही सिद्धार्थनगर) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह ५४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अजनीतीलच रहाटे (टोळी) नगरातील काजू राजू नाडे (वय २६) याच्या मटक अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी नाडेला अटक केली. त्याच्याकडून रोख आणि मोबाईलसह २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
चौथी कारवाई बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामनगर, मनीषनगरात पवन ऊर्फ हड्डी दामोदर महाजन (वय ४७) याच्या अड्ड्यावर पोलिसांनी केली.
त्याच्याकडून ३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नंदनवन, अजनी आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. याच कारवाई दरम्यान अजनी पोलिसांनी न्यू कैलास नगरातील दारू विक्रेता महेंद्र नामदेव शंभरकर याच्याकडे छापा घालून त्याच्याकडून देशी दारूच्या १० बाटल्या जप्त केल्या.
जुगार अड्ड्यांची सर्वत्र बजबजपुरी
एकाच वेळी चार मटका अड्ड्यावर कारवाई होण्याची ही पहिलीच कारवाई आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट सट्टा अड्डे, क्लबच्या नावाखाली जुगार, सट्टा अड्डे सुरू आहेत. अवैध दारूची विक्रीही केली जात आहे. पोलिसांचे अभय असल्याने क्लबच्या नावाखाली चालविल्या जाणाºया जुगार अड्ड्यांवर रोज लाखोंची हारजीत केली जाते. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी यापूर्वी अशा क्लबवरही छापे मारून तेथील जुगार उघडकीस आणला होता.