नागपुरातील नंदनवनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:32 PM2020-04-18T21:32:52+5:302020-04-18T21:33:59+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट ४ मधील पथकाने नंदनवनमधील दर्शन कॉलनीत चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी येथून १० जुगाऱ्यास जेरबंद केले आणि त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट ४ मधील पथकाने नंदनवनमधील दर्शन कॉलनीत चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी येथून १० जुगाऱ्यास जेरबंद केले आणि त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
दर्शन कॉलनीतील श्रीराम उपासे नामक व्यक्तीच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर गेल्या अनेक दिवसापासून जुगार अड्डा भरविला जात होता. त्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना कळाली. त्यावरून त्यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह उपासेच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी तिथे १० जुगारी जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १५ हजार ७०० रुपये, आठ मोबाईल आणि तासपत्ते असा एकूण १ लाख ४८ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
सर्वत्र कोरोनाची दहशत पसरली असताना हे जुगारी एकमेकाला खेटून छोट्या रूममध्ये जुगार खेळत असल्याचे धक्कादायक चित्र या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी बघितले. सर्व आरोपींविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात जमावबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक किरण चौगुले, हवालदार बट्टूलाल पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.
निखिल जीवतोडे, महेश बाविस्कर, नीलेश चिंचवडकर, अमोल शिंगणे, वसीम शेख गफार शेख, राजेश ढोबळे, अनिकेत गजभिये, रोशन अलोणे, किशोर डोरले आणि मंगेश रोकडे अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्याची नावे आहेत.