पालोरा शिवारातील जुगारावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:54+5:302021-09-13T04:08:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पालाेरा (ता. पारशिवनी) शिवारातील कालव्याच्या काठी जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पाेलिसांच्या पथकाने छापा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पालाेरा (ता. पारशिवनी) शिवारातील कालव्याच्या काठी जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पाेलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि जुगार खेळणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम व माेटारसायकली असा एकूण १ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १२) दुपारी करण्यात आली.
मोहन हिरालाल राऊत (वय ५३, रा. नेहरू लेआऊट पारशिवनी, रमेश वामनराव मोहोड (४०, रा. प्रभाग क्रमांक १२, पारशिवनी), तपस्वी नामदेव लांबट (६२, रा. प्रभाग क्रमांक १२, पारशिवनी) व गोविंदा रामचंद्र चौधरी (५३, रा. वाघोडा, ता. पारशिवनी) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. पारशिवनी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना पालोरा शिवारातील कालव्याजवळ जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने पाहणी केली.
जुगार आढळून येताच त्यांनी छापा टाकला व जुगार खेळणाऱ्या चाैघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १३ हजार रुपये किमतीच्या तीन माेटारसायकली, ४८ हजार ८०० रुपये राेख व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार हृदयनारायण यादव यांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, संदीप कडू, मुद्सर जमाल, रवींद्र बर्वे, महेंद्र जळीतकर यांच्या पथकाने केली.