नागपूरच्या गंगाजमुना येथील कुंटणखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 09:43 PM2019-05-07T21:43:09+5:302019-05-07T21:44:15+5:30
गंगाजमुना या वेश्या वस्तीत लकडगंज पोलिसांनी धाड टाकून राजस्थान येथील एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली तसेच एका महिला आरोपीस अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगाजमुना या वेश्या वस्तीत लकडगंज पोलिसांनी धाड टाकून राजस्थान येथील एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली तसेच एका महिला आरोपीस अटक केली.
अशासकीय संस्था (एनजीओ) फ्रीडम फर्मचे जॉय मसीह यांनी गंगाजमुना येथे अल्पवयीन मुलीकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली होती. या माहितीच्या आधारावर लकडगंज पोलिसांनी गंगाजमुना वेश्या वस्तीतील लज्जाबाई व सावित्रीबाई यांच्या कुंटणखान्यावर धाड टाकली. तेव्हा महिला आरोपी मालती नारंगा कर्मावत (४६) हिने एक अल्पवयीन पीडित मुलीला वेश्यागृहात डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अधिक माहिती काढली असता, पीडित अल्पवयीन मुलीला मालतीने राजस्थान येथून पळवून आणले होते. आपल्या उदरनिर्वाहाकरिता तिला वेश्यागृहात डांबून ठेवले होते. ती तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेत होती.
पोलिसांनी पीडित मुलीची मुक्तता करीत आरोपी मालतीला अटक केली. तसेच लज्जाबाई व सावित्रीबाई यांनी त्यांच्या मालकीच्या कुंटणखान्यातील खोली उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, लकडगंज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदान व्ही. पिदुरकर, राखी गेडाम, विजय हातकर, राजेश पोकळे, प्रशांत चचाने, हिरालाल राठोड, आशिष मोरे, संदीप शिरफुले, शीला बिसेन यांनी केली.