नागपुरात हाय प्रोफाईल कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:05 PM2019-04-16T22:05:09+5:302019-04-16T22:06:15+5:30
पाचपावलीतील राय सोसायटीत सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घालून हाय प्रोफाईल कुंटणखाना उजेडात आणला. या कुंटणखान्यावर बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील राय सोसायटीत सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घालून हाय प्रोफाईल कुंटणखाना उजेडात आणला. या कुंटणखान्यावर बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्या.
कोराडी नाक्याजवळच्या ओम सोसायटीत राहणारा मोहम्मद सरफराज इलियाज मेमन याने मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळच्या राय सोसायटीत ११० क्रमांकाचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी सरफराज हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला सोमवारी मिळाली. शहानिशा केल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सरफराजसोबत संपर्क साधला. त्याने आपल्याकडे देशी-विदेशी वारांगना उपलब्ध असल्याचे सांगून, त्यांचे मोबाईलमध्ये फोटोही दाखविले. त्यातील एकीचा सौदा केल्यानंतर सरफराजला पैसे देऊन ग्राहकाने तिला आतल्या रूममध्ये नेले. त्यानंतर काही वेळेनंतर तेथे पोलीस पथक धडकले. यावेळी पोलिसांना तेथे दोन बांगला देशी आणि एक रायपूर(छत्तीसगड)मधील वारांगना मिळाली. आरोपी मेमनने त्यांना नोकरीचे आमिष दाखवून १५ दिवसांपूर्वी नागपुरात बोलवून घेतले. तेव्हापासून तो त्या तिघींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता, असे त्या तिघींनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी मेमनविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनावणे, प्रीती कुळमेथे, हवालदार मुकुंदा गारमोडे, संजय पांडे, मनोजसिंग चौहाण, चंद्रशेखर घागरे, प्रफुल्ल बोंदरे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, अनिल मारकड तसेच सामाजिक कार्यकर्त्या सविता रेलकर, विजयाराणी रेड्डी यांनी ही कामगिरी बजावली.