उपराजधानीत हॉटेल, ढाब्यावर मद्यपींची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:04 AM2019-10-14T11:04:31+5:302019-10-14T11:06:24+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शहर पोलिसांनी शनिवारी शहरातील पाच हॉटेल, ढाब्यावर छापे मारले. या कारवाईत तेथे अवैध दारू विक्री केली जात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी हॉटेल, ढाब्याचे संचालक तसेच तेथे मद्यपान करणारे ग्राहक अशा एकूण २६ जणांविरुद्ध कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शहर पोलिसांनी शनिवारी शहरातील पाच हॉटेल, ढाब्यावर छापे मारले. या कारवाईत तेथे अवैध दारू विक्री केली जात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी हॉटेल, ढाब्याचे संचालक तसेच तेथे मद्यपान करणारे ग्राहक अशा एकूण २६ जणांविरुद्ध कारवाई केली.
शहरात आणि शहराबाहेर असलेल्या ढाबे, हॉटेल आणि भोजनालयात ग्राहकांना बिनबोभाट दारू पुरविली जाते. ते ध्यानात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शहर पोलिसांनी शनिवारी सदरमधील गजानन सावजी भोजनालय, जरीपटक्यातील सिंध मराठा भोजनालय, पाचपावलीतील काश्मिरी रेस्टॉरंट आणि पिंटू ढाब्यावर छापा घातला. येथे मद्यपान करण्याच्या तयारीत बसलेले सूर्यप्रकाश दीनानाथ ठाकूर, मोहनिश वालदे, मेहेरप्रकाश वर्मा, सरफरोस समशीर खान, सचिन सुरेश फुलबादे, राजेंद्रसिंग हरवनसिंग परमार, बादल उत्तम कुर्वे, हेमंत शिवाजी मेश्राम, नितीन हरिश्चंद्र रामटेके, अनिल हिरालाल कुळवेती, रॉकी हॅरी फ्रान्सिस, रत्नाकर अनिल रोडगे, रोशन कापसे, प्रदीप कापसे, विकास प्रधान, दिनेश वाघमारे, अनुष मोरे, अश्विन खांडेकर, कुणाल गोंडाणे आणि बादल कुर्वे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची मेयो रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६८ व ८४ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले.
परिमंडळ पाचचे उपायुक्त नीलोत्पल आणि उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे, अशोक शितोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
हॉटेल काश्मीरचा मालक फरार
पोलिसांनी उपरोक्त हॉटेल, ढाबा, भोजनालयातून १०,४०५ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी हॉटेल मालक विनय नित्यानंद जयस्वाल, संतोष भारत हरियानी, हरजिंदरसिंग, हरमनसिंग परमार यांना अटक करण्यात आली तर हॉटेल काश्मीरचा मालक फरार आहे. विशेष म्हणजे, ज्या कलमानुसार ही कारवाई झाली त्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याला रुपये पाच हजारपर्यंत आणि दारू पुरविणाऱ्याला २५ हजार रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. आतापर्यंत २९० मद्यपींना दोन हजारांपासून साडेचार हजारापर्यंतच्या दंडाची शिक्षा झाली आहे.