नागपुरात बुकी अजय राऊतच्या घरी छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 09:46 PM2019-04-08T21:46:22+5:302019-04-08T21:47:49+5:30
शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी छापा मारून त्याच्या मुलाला अटक केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी छापा मारून त्याच्या मुलाला अटक केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.
नागपूर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींचे महत्वाचे सेंटर आहे. ५०० पेक्षा छोटे मोठे बुकी येथे कोट्यवधींची खयवाडी करतात. पोलिसांना त्याची चांगली माहिती आहे. बड्या बुकींचे अड्डे बिनबोभाट सुरू आहेत. पोलीस अधून मधून छोट्या बुकींच्या अड्डयावर छापा मारून सक्रीयता दाखवतात. एकदा एखाद्या बुकीकडे कारवाई झाली की त्याच्याकडे नंतर अपवादानेच कारवाई होते. शहरातील जुना आणि मोठा बुकी म्हणून अजय राऊतचे नाव आहे. कुख्यात गुंड राजू भद्र्रे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी अजयचे दीड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. तेव्हापासून अजयचे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर अधोरेखित झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अजयची प्रकृती चांगली नसल्याने त्याचे खरे टाऊनमधील घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या क्रिकेट सट्टयाची सूत्रे त्याचा मुलगा अजिंक्यने सांभाळल्याची माहिती गुन्हे शाखेला शनिवारी कळली. त्यावरून पोलिसांनी
सापळा रचला. त्यानुसार, गुन्हे शाखेची महिला पोलीस कर्मचारी केअर टेकर म्हणून अजय राऊतच्या घरी गेली. दार उघडताच पोलिसांनी आत धडक दिली. आतमध्ये अजयचा मुलगा अजिंक्य (वय २१), पुतण्या निखिल मनोज राऊत (वय ३०) तसेच संजय मारोतराव खरवडे आणि रोहित घनश्याम खोब्रागडे (वय २४) चेन्नई सुपर किंग विरुद्ध किंग्स एलेवन पंजाब क्रिकेट सामन्यावर खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख, मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपसह २ लाख, ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. दोन वर्षांपूर्वी धडाकेबाज कारवायामुळे बुकींनी आपले बस्तान शहराबाहेर तसेच भंडारा, गोंदियाकडे हलविले होते. या नाट्यमय कारवाईनंतर शहरातील जुन्या बुकींना आता पुन्हा शहरातच आपले अड्डे सुरू केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर बुकी राऊत पिता-पुत्राचे धागेदोरे कोणकोणत्या बुकींसोबत जुळले आहे, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.