नागपुरच्या महेंद्रनगरातील कोंडवाड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:43 AM2018-06-06T00:43:00+5:302018-06-06T00:43:17+5:30
पाचपावली पोलिसांनी उत्तर नागपुरातील महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी छापा मारून शेकडो मुक्या जनावरांची मुक्तता केली. या जनावरांना गो-वंशाची तस्करी करणारांनी अत्यंत निर्दयपणे डांबून ठेवले होते. दुपारी १२ ला सुरू केलेली गोवंश मुक्तीची ही कारवाई मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरूच होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिसांनी उत्तर नागपुरातील महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी छापा मारून शेकडो मुक्या जनावरांची मुक्तता केली. या जनावरांना गो-वंशाची तस्करी करणारांनी अत्यंत निर्दयपणे डांबून ठेवले होते. दुपारी १२ ला सुरू केलेली गोवंश मुक्तीची ही कारवाई मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरूच होती.
गो-वंश तस्करी करणारे आरोपी मोठ्या संख्येत महेंद्रनगरात जनावरांना डांबून ठेवत असून, त्या मुक्या जीवांना कत्तलखान्यात पाठवले जाणार असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपयुक्त राहुल माकणीकर आणि ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी कारवाईची तयारी केली. मोठ्या संख्येत पोलीस बळ मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास महेंद्रनगरातील पाण्याच्या टाकीजवळ पाठविण्यात आले. पोलिसांचा छापा पडताच गो-वंश तस्करी करणारांनी पोलिस कारवाईचा जोरदार विरोध केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बळाचा वापर करताच तस्करी करणारांनी तेथून पळ काढला. त्यांच्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी सुमारे २५० जनावरांना अत्यंत निर्दयपणे कोंडवाड्यात कोंडून ठेवले होते. त्यांचे करकचून हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. हे सर्व जनावर कत्तलखान्यात पाठविण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी छापा मारल्याने या मुक्या जनावरांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे, अशा प्रकारे पोलिसांनी येथे यापूर्वीदेखिल कारवाई केली आहे. मात्र, आजची कारवाई यापूर्वीच्या कारवाईत सर्वात मोठी आहे.
चारापाण्याची सोय अन् धावाधाव
दुपारी मुक्या जनावरांची मुक्तता करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ही जनावरे गोरक्षणमध्ये पाठविण्याची धावपळ सुरू झाली. जास्त संख्येत जनावरे असल्याने गोरक्षणमधील जागा अपूरी पडली. त्यामुळे स्थानिक गोरक्षण, खापरी आणि बेल्यातही पोलीसांनी विचारणा केली. मात्र, पोलिसांना अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही, या मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत धावपळ सुरू होती. परिणामी मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहका-यांसह मध्यरात्रीपर्यंत कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया राबवत होते.