मोहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:06+5:302021-04-26T04:08:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पाेलिसांनी माहुली (ता. पारशिवनी) नजीकच्या हेटी शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात दारू गाळणाऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांनी माहुली (ता. पारशिवनी) नजीकच्या हेटी शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात दारू गाळणाऱ्या दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ३८ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
संदीप हरिदास मडावी (४२) व शुभम श्रीराम घोडेस्वार (२४, दाेघेही रा. मनसर, ता. रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. पारशिवनी तालुक्यात माेठ्या प्रमाणात माेहफुलाची दारू निर्मिती व अवैध विक्री केली जात असून, स्थानिक गुन्हे शाखा व पारशिवनी पाेलिसांच्या पथकाने अधूनमधून धाडी टाकून याला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूनिर्मिती सुरूच राहिली. त्यामुळे ‘लाेकमत’मध्ये शनिवारी ‘लाॅकडाऊनमध्ये अवैध दारूनिर्मितीला उधाण’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. या वृत्ताची दखल घेत पाेलिसांनी दारूभट्ट्यांविषयी माहिती गाेळा करण्याच्या कामाला वेग दिली.
दरम्यान, माहिती मिळताच पाेलिसांच्या पथकाने सायंकाळी हेटी (ता. पारशविनी) शिवाराची पाहणी केली. या शिवारातील कामठा नाल्याकाठी दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संदीप व शुभम या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचे २२० लिटर माेहफुलाची दारू, एक लाख रुपये किमतीचा माेहफुलाचा सडवा (दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन) व ८,५९० रुपये किमतीचे दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण २ लाख ३८ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती संताेष वैरागडे यांनी दिली.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, संदीप कडू, मुदस्सर जमाल, महेंद्र जळीतकर यांच्या पथकाने केली.