कुख्यात फातोडेच्या जुगार अड्ड्यावर छापा : नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 09:24 PM2020-08-14T21:24:01+5:302020-08-14T21:25:38+5:30
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि साहित्यासह ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
फातोडे हा कुख्यात गुंड असून त्याला यापूर्वी पोलिसांनी मोक्कासुद्धा लावला आहे. एक वर्षापूर्वी त्याला नागपुरातून हद्दपार करण्यात आले होते. तेव्हापासून फातोडेचा जुगार अड्डा कुख्यात गुंड पंकज भल्ला सांभाळतो. फुटाळा तलावाजवळ एका गल्लीत भल्ला आणि फातोडे हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना मिळाली. त्यावरून त्यांनी गुरुवारी रात्री १० च्या सुमारास विशेष पथकाला जुगार अड्ड्यावर छापा मारण्याचे आदेश दिले. पोलीस अड्ड्यावर पोहचले यावेळी तेथे कुख्यात फातोडे, पंकज ऊर्फ भल्ला, सुमित कल्लू चौधरी, राजू बाबुराव किरनाके, भगवंत डोमाजी सोनवाने, अंकुश हरिदास बनसोड, सुरेश गणपतराव खापेकर, शालिक रामगीन यादव आणि हरीश छोटेलाल यादव हे तास पत्त्यावर जुगार खेळताना सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तेथून रोख रक्कम, वाहन, मोबाईल आदीसह एकूण ९६ हजार, २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंबाझरी पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
पळण्याची संधी नाही!
ज्या ठिकाणी हा जुगार अड्डा चालतो. तेथून पळून जाण्यासाठी अनेक गल्ल्या आहेत. मात्र, पोलिसांनी जुगार अड्ड्याला चोहोबाजूने घेराव घातला होता. त्यामुळे आरोपींना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र घुगे, नायक रेमंड, गिट्टीखदान मधील पोलीस उपनिरीक्षक साजिद अहमद, युवराज भोसले, नायक इम्रान, संतोष, पोलीस शिपाई, आशिष अजय, विजेंद्र आणि सुनील यांनी ही कामगिरी बजावली.