कामठी तालुक्यातील बनावट दारू कारखान्यावर धाड; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त, सूत्रधारासह अनेक फरार
By नरेश डोंगरे | Published: April 17, 2024 12:19 AM2024-04-17T00:19:09+5:302024-04-17T00:20:58+5:30
अन्य साहित्यासह सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: कामठी तालुक्यातील एका पोल्ट्री फाॅर्मवर स्टेट एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क विभाग)च्या पथकाने आज छापा घालून बनावट दारू कारखाना उघडकीस आणला. या कारखान्यातून दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरीट, सुगंधीत अर्क तसेच अन्य साहित्यासह सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापासून केवळ कागदी घोडे नाचवून कारवाईकडे अर्थपूर्ण डोळेझाक करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाची सूत्रे हाती घेताच नव्या दमाच्या अधिकाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई करून अशा प्रकारचा गोरखधंदा करणाऱ्या मद्य सम्राटांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सूरजकुमार रामोड यांना कामठी तालुक्यात बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची आणि येथून मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करून हा माल दुसरीकडे पाठविला जात असल्याची माहिती मिळाली होती. कामठी तालुक्यातील माैजा कवठा येथील शेतशिवारात एका विटाभट्टीच्या आडून असलेल्या पोल्ट्री फॉर्ममध्ये हा दारूचा कारखाना चालविला जात असल्याचे कळाल्याने शहानिशा केल्यानंतर १६ एप्रिलच्या पहाटे ३.३० च्या सुमारास मोठा फाैजफाटा घेऊन एक्साईजचे अधिकारी, कर्मचारी तेथे धडकले.
कारखान्यात यावेळी स्पिरिट, देशी दारूचा तयार अर्क, लिंबू आणि संत्र्याचा स्वाद तसेच सुगंधी अर्क, ९४ हजार, ५०० रिकाम्या बाटल्या (९० मिलिच्या), रॉकेट संत्रा ब्राण्डचे ४४, ५०० लेबल, बाटल्यांना बूच लावण्यासाठी वापरली जाणारी मशिन, पंप आणि अन्य साहित्यासह एकूण २० लाख, ७३ हजारांचा मुद्देमाल आढळला. तो जप्त करण्यात आला. एक्साईजचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक सूरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शैलेष अजमिरे, विक्रमसिंग मोरे, मोहन पाटील, जयेंद्र जठार, रवींद्र कोकरे, मंगेश कावळे तसेच उमेश शिरभाते, रणधिर गावंडे, सुरेश राजगडे, नारायण सुर्वे, अमित क्षिरसागर, अजय खताळ, योगेश यलसटवाड, सुनयनावाघमारे, शिरीश देशमुख, समीर सईद, स्नेहा रोकडे, रोहिणी पात्रीकर, सूरज सहारे, चंदू गोबाडे, मुकेश गायधने, ललिता जुमनाके, प्रशांत गेडाम, प्रशांत धावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
सूत्रधारांसह अनेक फरार
कारवाईची आधीच कुणकुण लागली की काय कळायला मार्ग नाही. मात्र, छापा कारवाईदरम्यान तेथे केवळ एक जण आढळला. हा कारखाना कोण चालवितो, माल कुठे कुुठे पाठवितो आणि या रॅकेटमध्ये कोण सहभागी आहेत, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढच्या काही तासात चाैकशीतून ते उघड होईल, असे एक्साईज अधिकारी सांगत आहेत.