उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:59 AM2023-04-17T10:59:35+5:302023-04-17T11:00:13+5:30

एकूण ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Raid on 'IPL' cricket betting in Umred, Butibori; Eight police arrested | उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत

उमरेड, बुटीबाेरी येथील ‘आयपीएल’ क्रिकेट सट्ट्यावर धाडी; आठ आराेपी अटकेत

googlenewsNext

नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शनिवारी (दि. १५) रात्री एकाच वेळी उमरेड शहर आणि बुटीबाेरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाेथली (ता.नागपूर ग्रामीण) शिवारात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सट्ट्यांवर धाडी टाकल्या. यात एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ३२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती एलसीबीचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.

शनिवारी राॅयल चॅलेंजर बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यावर उमरेड शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती मिळताच, एलसीबीच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून चाचपणी केली. त्या ग्राहकाने सूचना देताच, पथकाने लगेच धाड टाकली. यात राजेश सुरेश भुयारकर (४५), अक्षय मंगेश महल्ले (२९), राहुल खुशालराव इरदांडे (२९), संजय चंद्रभान लेंडे (५२), अनिल आनंदराव झोडे (५३), सर्व रा.उमरेड आणि आशिष मनोहर अग्निहोत्री (३६, रा.परसोडी, ता.उमरेड) या सहा जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ४०,७५० रुपये राेख, ६९ हजार रुपयांचे पाच माेबाइल फाेन आणि १३ हजार रुपयांचा टीव्ही व सेट टाॅप बाॅक्स असा एकूण १ लाख २२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

एलसीबीच्या दुसऱ्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री बाेथली (फाटक) शिवारातील उड्डाण पुलाजवळ उभ्या असलेल्या एमएच-३१/डीसी-३१४४ क्रमांकाच्या कारला घेराव करून झडती घेतली. त्या कारमध्ये बसलेले पंकज परसराम वाधवानी (४७, रा.जरीपटका, नागपूर) व अनिल मदनलाल अग्रवाल (५४, रा.नेताजी चौक, कामठी) हे दाेघे आयपीएलच्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर सट्टा स्वीकारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दाेघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा कार व १० हजार रुपयांचे चार माेबाइल फाेन असा एकूण ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई एलसीबीचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे, सहायक पाेलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, अनिल राऊत व आशिषसिंग ठाकूर, सहायक फाैजदार चंद्रशेखर गाडेकर, अरविंद भगत, दिनेश अधापुरे, मिलिंद नांदुरकर, महेश जाधव, अजीज शेख, सतीश राठोड, मयूर ढेकले, सत्यशील कोठारे, अमृत किनगे, अमोल कुथे, आशुतोष लांजेवार यांच्या पथकांनी केली. या दाेन्ही प्रकरणांत उमरेड व बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

‘लाेकमत’ने फाेडली वाचा

‘लाेकमत’मध्ये ‘ग्रामीण भागात आयपीएल क्रिकेट सट्ट्याला उधाण’ या शीर्षकाखाली रविवारी (दि. २ एप्रिल) वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. सर्वाधिक सट्टा अड्डे उमरेड, बुटीबाेरी आणि काेराडी भागात असल्याचे त्या वृत्तात नमूद केले हाेते. त्या अनुषंगाने एलसीबीने चाचपणी करायला सुरुवात केली आणि दाेन ठिकाणी धाडी टाकल्या. या सट्टा अड्ड्यांबाबत उमरेड व बुटीबाेरी पाेलिस अनभिज्ञ असल्याने नवल व्यक्त केले जात आहे.

वाहनांची तपासणी करणे आव्हान

पूर्वी क्रिकेट सामन्यांवरील सट्टा खाेलीत स्वीकारला जायचा. अलीकडे कारमध्ये बसून स्वीकारले व नमूद केले जात असल्याचे बाेथली शिवारातील कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असल्या वाहनांचा शाेध घेऊन आराेपींना पकडणे, एलसीबीसाेबतच नागपूर ग्रामीण पाेलिसांसमाेर आव्हान ठरणार आहे.

Web Title: Raid on 'IPL' cricket betting in Umred, Butibori; Eight police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.