‘ओयो’मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 10:30 PM2022-07-20T22:30:39+5:302022-07-20T22:32:35+5:30
Nagpur News परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करविणाऱ्या सेक्स रॅकेटचा नागपूर पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने भंडाफोड केला आहे.
नागपूर : परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करविणाऱ्या सेक्स रॅकेटचा नागपूर पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने भंडाफोड केला आहे. सापळा रचून गड्डीगोदाम येथील ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे ही कारवाई करण्यात आली. या धाडीत एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून सूत्रधार रोशन ऊर्फ सलमान राजेश डोंगरे (३३, अंबाझरी हिल टॉप, पांढराबोडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे देहव्यापार चालतो अशी टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व डमी ग्राहक पाठविला. ग्राहकाने रोशनशी मुलीचा सौदा केला व त्याने इशारा दिल्यावर पोलिसांनी धाड टाकली. रोशन परराज्यातील गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा व त्यांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचा. त्याच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे, संतोष जाधव, अनिल अंबाडे, संदीप चंगोले, भूषण झाडे, मनिष रामटेके, अश्विन मांगे, समीर शेख, रिना जाऊळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.