खापरखेड्यातील व्हिडीओ गेम पार्लरवर छापा; २६ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 11:30 AM2023-06-10T11:30:29+5:302023-06-10T11:30:48+5:30
व्हिडीओ पार्लरच्या आड जुगार अड्डे : पोलिासांची सात ठिकाणी कारवाई
खापरखेडा (नागपूर) : मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या माध्यमातून जुगार अड्डे चालविणाऱ्या सात ठिकाणी खापरखेडा पोलिसांनी गुरुवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून २६ जणांना जेरबंद केले. या कारवाईमुळे जुगार अड्डा चालविणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खापरखेडा शहरात मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या आडून जुगाराचे अड्डे सुरू झाले आहे. या अड्ड्यावर दिवसरात्र जुगाऱ्यांची वर्दळ राहते. कामगारांसोबतच अनेक महाविद्यालयीन तरुणही या जुगाराच्या नादाला लागले आहेत. त्यामुळे जुगार अड्डा चालविणारे दररोज लाखोंचे वारेन्यारे करीत आहेत. बिनधास्त चालणाऱ्या या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी वेगवेगळ्या सात चमू बनवून गुरुवारी सात जुगार अड्ड्यावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांच्या हाती जुगाराच्या ८८ मशिन्स लागल्या. या मशीनची किंमत १७ लाख, ६० हजार रुपये आहे. शिवाय पोलिसांनी तेथून १८ हजार, ८० रुपयांची रोख आणि ७ हजार, २०० रुपयांचे साहित्यही जप्त केले. जुगार अड्डा चालविणारे आणि खेळणारे असे एकूण २६ जण पोलिसांनी पकडले.
पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि एसडीपीओ आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रवीण मुंडे, सहायक निरीक्षक दीपक कांक्रेडवार, उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा तसेच राजेश पिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
दिवसभर धावपळ
या कारवाईमुळे खापरखेडाच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी अशाप्रकारे जुगार अड्डे चालविले जातात, त्या सर्व संचालकांमध्ये चांगलीच खळबळ माजली. 'सेफ झोन'मध्ये येण्यासाठी आज दिवसभर जुगार अड्डा संचालकांची धावपळ सुरू होती.
सदरमधील कॅफेमध्ये हुक्का पार्लर
नागपूर : सदरमधील एका कॅफेच्या आड चक्क हुक्का पार्लर सुरू होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने तेथे धाड टाकून एका आरोपीला अटक केली. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माऊंट रोडवरील बुटी कंपाऊंडमध्ये ठिकाणा कॅफे आहे. तेथे हुक्का पुरविल्या जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता तेथे आरोपी निखील खुशाल कुमारिया (३०, प्लॉट क्र. २१८, सुदाम रोड, इतवारी) याच्या ताब्यात हुक्क्याचे पॉट्स, हुक्का फ्लेवर असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याविरोधात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हे शाखेने त्याला सदर पोलिस ठाण्यातील पथकाच्या हवाली केले.