नागपुरातील मटका किंग तुलसी मसरामच्या अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:57 AM2018-09-12T00:57:55+5:302018-09-12T00:58:51+5:30
मानकापुरातील मटका किंग तुलसी मसरामच्या सट्टा अड्ड्यावर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून १३ सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापुरातील मटका किंग तुलसी मसरामच्या सट्टा अड्ड्यावर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून १३ सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त करण्यात आली.
मानकापूरच्या सादिकाबाद कॉलनीत मसरामचा मटक्याचा अड्डा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, तुलसी मसराम मानकापूर पोलिसांसोबतच कोराडी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील तसेच गुन्हेशाखेतील काही विशिष्ट पोलिसांना महिन्याला हजारो रुपयांची देण देतो. त्यामुळे तुलसीच्या अड्ड्यावरचा मटका फोडण्याची पोलीस तसदी घेत नाहीत. त्यामुळे त्याच्या मटका अड्ड्यावर दारूच्या दुकानासारखी गर्दी असते. परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांना ही माहिती कळताच त्यांनी सीताबर्डी पोलिसांना छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने तुलसीच्या अड्ड्यावर छापा मारला. यावेळी तेथे रजत रामाजी मोहोड, शेख शहबाज शेख हारून, अंकुश कुशील वासनिक, बंटी भाऊराव उईके , सुधाकर चिंधूजी नान्हे , दिलीप नत्थूजी सोनटक्के , विलास आत्माराम बडपात्रे, एहतेशाम गुलशन खान, हमीद यूसुफ खान, अनिल श्यामसिंह बघेल, इमरान खान वसीम खान, विकास वसंतलाल खाडोळे आणि मनोज वसंतराव मसराम हे सट्टेबाज आकड्याचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तेथून रोख २२२७३५ रुपये, मोबाईल तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. या दुचाकीत पोलिसांना महेंद्र मुरलीधर भगतच्या नावे पाच आणि तुलसी मसरामच्या नावे एक समन्स सापडला. आकड्याची खायवाडी करणारा आरोपी रजत मोहोड याने हा मटका अड्डा तुलसी मसरामचा असल्याचे पोलिसांना सांगितले. सादिकाबाद कॉलनीतील पासपोर्ट आॅफिसजवळ बाल्या चौधरीच्या कॉम्प्लेक्समध्ये गाळा घेऊन तुलसी तेथून मटका अड्डा चालवित होता.
पोलिसांची पोलखोल
पोलीस उपायुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे मानकापूर पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे. एवढा मोठा मटका अड्डा सुरू असताना पोलिसांनी डोळे बंद का करून घेतले होते, या प्रश्नाचे उत्तर आता मानकापूर पोलिसांना द्यावे लागणार आहे.