गंगा-जमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:41 PM2019-04-02T23:41:09+5:302019-04-02T23:47:45+5:30

लकडगंजमधील रेड लाईट एरिया गंगाजमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या पॉश कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून राजस्थानमधील दोन तरुणींना रंगेहात पकडले.

Raid on White House in the Ganga-Jamuna | गंगा-जमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये छापा

गंगा-जमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये छापा

googlenewsNext
ठळक मुद्देपॉश कुंटणखाना उजेडात : राजस्थानमधील दोन वारांगना ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंजमधील रेड लाईट एरिया गंगाजमुनातील बहुचर्चित व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या पॉश कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून राजस्थानमधील दोन तरुणींना रंगेहात पकडले. हा कुंटणखाना चालविणारी अलका गुमगावकर (वय ३५) आणि मोनी गुमगावकर (वय २९) या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगाजमुना परिसर देहविक्रयासाठी अनेक वर्षांपासून कुपरिचित आहे. मात्र, दोन वर्षांपासून पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्याने येथील अनेक वारांगनांनी कुंटणखाने सोडून दुसरीकडे पळ काढला. मात्र, काही वारांगना अजूनही येथेच धंदा करतात. त्यांच्यातीलच अलका आणि मोनी व त्यांच्या दलालांनी ग्राहकांसाठी व्हाईट हाऊसची निर्मिती केली होती. वारांगना आणि ग्राहकांची तेथे दिवसभर वर्दळ असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत होता. त्यातून गुन्हे शाखेच्या पथकाला व्हाईठ हाऊसची टीप मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने आपल्या पंटरच्या माध्यमातून या कुंटणखान्याच्या दलालाशी सौदा केला. अडीच हजारात तरुणी उपलब्ध करून देण्याचे ठरल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पंटर पाठोपाठ कुंटणखान्यावर धडक दिली. तेथे अलका आणि मोनी तसेच त्यांच्या ताब्यातून देहविक्रय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही तरुणी राजस्थानमधील मूळ निवासी असून अनेक वर्षांपासून त्या वेश्याव्यवसायात सक्रिय असल्याचे समजते. दरम्यान, व्हाईट हाउसमधील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारल्याचे कळताच या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनी कारवाई सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत अड्ड्यासमोर मोठी गर्दी केली होती.
मोबाईलवर मुंहदिखाई!
येथे येणाऱ्या ग्राहकांना अलका आणि मोनीचे दलाल मोबाईलवर वारांगनांचे फोटो दाखवत होते. त्यानंतर पसंत केलेल्या वारांगनेला बोलवून ग्राहकाच्या हवाली केले जात होते. येथे अनेक वारांगना रोज वेश्याव्यवसाय करीत होत्या. पोलिसांच्या तपासात भली मोठी यादी उजेडात येऊ शकते. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.वृत्त लिहिस्तोवर लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Raid on White House in the Ganga-Jamuna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.