नागपुरात ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:11 AM2019-03-23T01:11:37+5:302019-03-23T01:12:30+5:30

ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी करून पोलिसांनी लाखोंचा दारुसाठा जप्त केला. या प्रकरणी गिट्ठीखदानमधील पितापुत्रासह वर्धा जिल्ह्यातील वाहनचालक आणि कामठीतील एक महिला अशा एकूण पाच जणांना अटक केली.

Raiding illegal liquor shoppers in Nagpur | नागपुरात ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी

नागपुरात ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी

Next
ठळक मुद्देलाखोंचा दारुसाठा जप्त : पितापुत्रासह पाच जणांंना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणच्या अवैध दारू विक्रेत्यांकडे छापेमारी करून पोलिसांनी लाखोंचा दारुसाठा जप्त केला. या प्रकरणी गिट्ठीखदानमधील पितापुत्रासह वर्धा जिल्ह्यातील वाहनचालक आणि कामठीतील एक महिला अशा एकूण पाच जणांना अटक केली.
गिट्टीखदानमधील कुख्यात दारू विक्रेता प्रभूदास मेश्राम याच्या अड्ड्यावर परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा मारून २ लाख, ३१ हजारांची दारू पकडली.
मेश्राम गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करतो. पोलिसांसोबत लेनदेन असल्याने त्याला कारवाईचा धाक नाही. होळी-धुळवडीच्या निमित्ताने मेश्रामने मोठ्या प्रमाणात दारूसाठा जमविल्याची माहिती कळताच उपायुक्त पंडित यांच्या पथकाने बुधवारी रात्री मेश्रामच्या हजारी पहाड, आझादनगरातील घरी छापा मारला. यावेळी पोलिसांना तेथे मोठ्या प्रमाणात दारूचे घबाड मिळाले. २ लाख, ३१ हजारांची दारू जप्त करून पोलिसांनी प्रभूदास सखाराम मेश्राम (वय ६५), त्याचा मुलगा अजय मेश्राम (वय ४५) आणि अशोक मदरेस्वामी पिल्ले (वय ४६) या तिघांना अटक केली.
विशेष म्हणजे, अवैध दारू विक्रीच्या गोरखधंद्यात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेला मेश्रामने स्वत:च्या घरात कमी आणि त्याच्याकडे भाडेकरू असलेल्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात दारूसाठा करून ठेवला होता. पोलिसांनी आठ ते दहा ठिकाणी झाडाझडती घेऊन मेश्रामने लपवून ठेवलेला दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे, पोलीस उपायुक्त पंडित यांनी या कारवाईबाबत शेवटपर्यंत गोपनीयता बाळगण्याचे कडक निर्देश दिल्यामुळेच कुख्यात मेश्रामकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात यश मिळाले. या कारवाईत परिमंडळ दोन पथकातील उपनिरीक्षक सचिन मते तसेच प्रवीण जोगी, रेमंड,अजय, विजेंद्र, घनश्याम, आसाराम तसेच बबिता नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दुसरी कारवाई हिंगण्यात करण्यात आली. एमएच ३२/ वाय ४६६८ च्या चालकाने बुधवारी रात्री गस्तीवरील पोलिसांचे वाहन पाहून संशयास्पद हालचाल केली. त्यामुळे पोलिसांनी ही कार थांबवून तिची तपासणी केली असता कारमध्ये दारुच्या बाटल्या भरलेले १० बॉक्स आढळले.
पोलिसांनी कारचालक प्रसाद सुरेश भोयर (वय २९, रा. हिंगणी, जि. वर्धा) याला अटक करून त्याच्या ताब्यातून कार तसेच दारूच्या बाटल्यासह ३ लाख, ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार तिवारी, हवलदार दिलीप ठाकरे, विनोद कांबळी, अजय पाटील, चंद्रशेखर बहादूरे, अभय पुडके, रामप्रसाद पवार, प्रितेश धंगारे, संजय तायडे, राहुल पोकळे आणि कमलेश ठाकूर यांनी बजावली.
परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कामठीच्या जयस्तंभ चौकाजवळच्या रमानगरात दुर्गा बंडू आसवले (वय ५०) हिच्या घरी छापा मारून १९, ९६८ रुपयांची दारू जप्त केली. हा दारूसाठा जमविण्यास मदत करणारा आरोपी मनीष यादव पोलिसांना पाहून पळून गेला. दुर्गा आणि मनीषविरुद्ध कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनीषचा शोध घेतला जात आहे.
वरिष्ठांमुळेच छापेमारी
होळी - धुळवडीला अनेक ठिकाणी दारूचा महापूर वाहतो. हे ध्यानात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाणेदारांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील दारूच्या गुत्त्यांवर छापेमारी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मोठी देण मिळत असल्याने ठाण्यातील पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ते लक्षात घेत तीनही ठिकाणी पोलीस उपायुक्तांच्या पथकांनीच छापेमारी केली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त होऊ शकला.

 

 

Web Title: Raiding illegal liquor shoppers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.