राज्यात धाडी १४५ पेट्रोलपंपांवर, कारवाई सातवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:27 PM2018-01-15T13:27:13+5:302018-01-15T13:31:37+5:30
वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे.
राजेश निस्ताने
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे.
प्रत्येक शहरातील दोन-तीन पेट्रोलपंपांचा अपवाद वगळता उर्वरित पेट्रोलपंपांबाबत वाहनधारकांकडून नेहमीच ओरड व तक्रारी ऐकायला मिळतात. तेथे जाणीवपूर्वक पेट्रोल कमी दिले जात असल्याचे सांगितले जाते. काही पेट्रोलपंपांवर राज्यात विशिष्ट पद्धतीची चीप बसवून त्याद्वारे पेट्रोल कमी भरण्याचे प्रकार सुरू होते. ठाणे पोलिसांनी एका चीप विक्रेत्या तज्ज्ञाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून राज्यात कोण-कोणत्या पेट्रोलपंपावर चीप बसविली, याची यादीच मिळविली. त्या आधारे पोलिसांनी वैद्यमापन अधिकाºयांना सोबत घेऊन संबंधित संशयित पेट्रोलपंपावर धाडी घातल्या. बहुतांश ठिकाणी ही चीप आढळली. त्यामुळे तेथे सुरुवातीला पेट्रोलपंप सील करणे, विक्रीबंद आदेश देणे अशी प्राथमिक कारवाई करण्यात आली. परंतु नंतर ही पेट्रोलपंपे काही दिवसातच सुरू झाली. यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा अशाच एका पेट्रोलपंपावर ही चीप आढळली होती.
पेट्रोल- डिझेल वितरणात दांडी
१८ मे २७ मे २०१७ या काळात तेल उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष मोहीम राबविली गेली. त्यात १४५ पेट्रोलपंप तपासले गेले. तेव्हा पेट्रोलचे चार नोझल्स व डिझेलचे दोन नोझल्स कमी वितरण करीत असल्याचे निदर्शनास आले. सहा पेट्रोलपंपावरील साठ्यामध्ये तफावत आढळली. या धाडी प्रकरणात केवळ सात पेट्रोलपंपांना विक्रीबंद आदेश दिले गेले. तसा अहवाल तेल उत्पादक कंपन्यांच्या राज्य समन्वयकांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याला सादरही केला आहे. काही पेट्रोलपंपाबाबत गृह खात्याने पेट्रोलियम कंपन्यांना सूचित केले आहे.
वैधमापनला तपासणी बंधनकारक
नियमानुसार वैद्यमापन शास्त्र विभागाने वर्षातून किमान एकदा पेट्रोल-डिझेल पंपाची पडताळणी करणे बंधनकारक आहे. परंतु ही पडताळणी नियमित होते का हा संशोधनाचा विषय आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या धाडीनंतरही अनेक पेट्रोलपंपांकडे संशयाने पाहिले जात आहे.
आजही अनेक ठिकाणी पेट्रोल कमी देण्यावरून मारहाणीच्या घटना घडत आहे. पोलिसात गुन्हेही नोंदविले जात आहे.