नागपुरातील बिल्डर्सवरील छापे; मालमत्ता नोकरांच्या नावाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:25 AM2019-06-28T11:25:59+5:302019-06-28T11:26:23+5:30
नागपुरातील सहापैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील सहापैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आज प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली व उरलेले तीन बँक लॉकर्सही उघडले. या लॉकरमधून जवळपास दोन किलो सोन्याचे दागिने व बेनामी संपत्तीचे कागदपत्र सापडल्याची माहिती आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पाच बिल्डरपैकी एका बिल्डरने दोन जमिनी आपल्या दोन नोकरांच्या नावाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे २० कोटी आहे.
बेनामी ट्रान्झॅक्शन (प्रोहिबिशन) अॅक्ट २०१६ या कायद्यानुसार बेनामी मालमत्ता सरकारजमा करण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे. अधिकाऱ्यांनी या दोन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या आहे व दोन्ही नोकरांची चौकशी सुरू केली आहे. आजच्या कारवाईमध्ये अतुल यमसनवार यांच्या आॅरेंज सिटी हाऊसिंग फायनान्सचा संचालक असलेल्या धंतोलीतील एका प्रख्यात बिल्डरचेही नाव समोर आले आहे. सदर्हू बिल्डर हा इतर सहा कंपन्यांचाही संचालक असून राजकीय वर्तुळात सक्रिय आहे.
या बिल्डरचे यमसनवार यांच्याशी काय व्यावसायिक संबंध आहेत याचीही चौकशी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे अशी माहिती सूत्रानी दिली.
दरम्यान प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी या सहा बिल्डरांनी केलेले बेनामी व्यवहार २०० कोटींच्या घरात असावे असे अनुमान काढले आहे, परंतु नेमके किती उत्पन्न दडविले व किती करचोरी केली हे सगळ्या कागदपत्रांची छाननी/ पडताळणी झाल्यानंतरच कळू शकेल अशी माहिती मिळाली.
आज प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी या सहाही बिल्डरांच्या घरात पी.यू. (प्रोटेक्टड युनिट) तयार केले आहेत. पी.यू.मध्ये घरातील एका खोलील जप्त केलेले दस्तावेज व इतर पुरावे ठेवले जातात व त्याला प्राप्तिकर खात्याचे अधिकारी कुलूप लावतात. या खोलीत केव्हाही येण्या-जाण्याचे अधिकार प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रोटेक्टेड युनिट ही शेवटची कारवाई समजली जाते त्यामुळे या पाचही बिल्डरांवरील छापे आज उशिरा रात्रीपर्यंत संपण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.