नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तस्करांवर छापे; ५ आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:11 PM2023-01-09T12:11:00+5:302023-01-09T12:12:14+5:30
८ लाखांचा माल जप्त
नागपूर : नायलॉन मांजाची विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून ५ जणांना अटक केली. यात नायलॉन मांजासह ८ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शांतीनगर पोलिसांना दही बाजार पुलाजवळ एका चारचाकी वाहनातून नायलॉन मांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक राजनारायण तिवारी यांच्या पथकाने रविवारी दुपारी वाहनाला थांबवून तपासणी केली. त्यात नायलॉन मांजाची चक्री मिळाली. पोलिसांनी वाहनातील हबीब शेख रफिक शेख (२०), रा. बंगाली पंजा व राजेश प्रभू धुर्वे (३०), रा. भालदारपुरा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी हा मांजा कुख्यात कल्याणी व त्याचा साथीदार सोनू याचा असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितल्यानुसार हबीब व राजेश मांजाची डिलिव्हरी देणार होते. पोलिसांनी कल्याणीला पकडण्यासाठी भालदारपुरा येथे सापळा रचला; परंतु तो हाती लागला नाही.
नेता व पत्रकार सांगून 'तो' लोकांना धमकावतो
कल्याणी नायलॉन मांजाचा मोठा तस्कर आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो स्वत:ला नेता व पत्रकार सांगून लोकांना धमकावतो. पोलिसांनी आरोपीकडून नायलॉन मांजा, वाहनासह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई तहसील पोलिस ठाण्याच्या जवळील गांधीबाग सूत मार्केटजवळ करण्यात आली. काही लोकांकडून नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून राकेश पुणितराम सोनबोईर (२५), नीरज किशोर बरालिया (२५), रा. बजरंग चौक, पारडी व गौरव बाळकृष्ण कुंभरे (२३), रा. मरारटोली, अंबाझरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून नायलॉन मांजा व दुचाकीसह १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.