नागपूरची औद्योगिक वसाहत बुटीबोरीत ‘रेल नीर’ प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:38 AM2018-10-05T11:38:28+5:302018-10-05T11:40:33+5:30
आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत प्रवास करताना अनेक प्रवासी पाण्याच्या बाटल्या विकत घेतात. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे अवैध व्हेंडरकडून रिकाम्या बाटल्यात दूषित पाणी भरून त्याची विक्री होते. परंतु आता नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागला आहे. आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल नीर बॉटलिंग प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकदा आयआरसीटीसीचे अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला. अखेर बुटीबोरी येथे हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. घोषणा झाल्यानंतर चार वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. बुटीबोरी येथे १० हजार चौरसफुटांवर रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई येथे आयआरसीटीसीने रेल नीरचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातून मोजक्याच रेल्वेस्थानकांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागपुरात रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला. बुटीबोरीच्या रेल नीर प्रकल्पात दररोज ७२ हजार लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती होणार आहे. नागपुरातून दिवसाकाठी १२० ते १३५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यात प्रवाशांची संख्या ३५ ते ४० हजार आहे. रेल नीर प्रकल्पामुळे आता या प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरसह सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतुल, घोडाडोंगरी, आमला या रेल्वेस्थानकांना या रेल नीर प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जर्मनीवरून मागविल्या मशीन
बुटीबोरी येथील रेल नीर प्लँटसाठी जर्मनीवरून मशीन बोलाविण्यात आल्या आहे. अत्याधुनिक या मशीनद्वारे पाणी स्वच्छ करून ते बाटलीबंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरवरून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यातील प्रवाशांना आता शुद्ध पिण्याचे पाणी प्रवासात उपलब्ध होणार आहे.
औपचारिकता पूर्ण होताच प्रकल्प सुरू
‘बुटीबोरी येथील आयआरसीटीसीचा रेल नीर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. औपचारिकता पूर्ण होताच उन्हाळ्यापूर्वी आगामी तीन ते चार महिन्यात या प्रकल्पात शुद्ध पाण्याची निर्मिती सुरु होईल.’
-पिनाकीन मोरावाल, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी