नागपुरात तिकीट दलालांवर रेल्वेचा फास : एकाच दिवशी तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:36 PM2019-06-14T21:36:09+5:302019-06-14T21:38:33+5:30
रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांच्या निर्देशावरून गुप्त पद्धतीने चालविण्यात आलेल्या ‘मिशन स्टॉर्म’ अंतर्गत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफ शाखेने कारवाई करून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तीन दलालांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांच्या निर्देशावरून गुप्त पद्धतीने चालविण्यात आलेल्या ‘मिशन स्टॉर्म’ अंतर्गत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफ शाखेने कारवाई करून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तीन दलालांना अटक केली. लार्सन सुनील अल्फान्सो (२४) रा. पद्मावतीनगर, गोधनी, संजय गोपाल सिरीया (४३) मानकापूर आणि विशाल रामभाऊ चौरागडे (३९) अशी आरोपींची नावे आहेत. तिघांजवळ ६४ हजार ४३० रुपयांच्या २९ लाईव्ह तिकिटांसह कॉम्प्युटर आणि ९ लाख ५० हजार ३४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अनेक दिवसांपासून ई-तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने सापळा रचून या तिन्ही दलालांना अटक केली आहे.
७.५३ लाखाची जुनी तिकिटे
तिन्ही दलालांजवळ ६१८ जुनी ई-तिकिटे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत ७ लाख ५३ हजार ९१७ रुपये होती. यातील गोधनी येथील रहिवासी लार्सन याच्या जवळ सर्वाधिक ५ लाख रुपयांची ४९१ तिकिटे संगणकातून जप्त करण्यात आली आहेत. यावरुन हे तिघेही अनेक दिवसांपासून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहम्मद मुगिसुद्दीन, सतीश इंगळे, प्रकाश रायसेडाम, इशांत दीक्षित, आर. एस. बागडेरीया, सुभाष आदवारे, एस. घोष यांनी पार पाडली.
झोनचा देशात दुसरा क्रमांक
गुरुवारी आणि शुक्रवारी देशभरात २०५ प्रमुख शहरात एकाचवेळी हे अभियान राबविण्यात आले. अभियानात ३३८ ठिकाणी कारवाई करून ३७५ गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ४२ कोटींची ई आणि सामान्य टिकीट जप्त करण्यात आली. त्यांची संख्या २२ हजार ५०० आहे. विशेष म्हणजे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनने कारवाईत दुसरा क्रमांक मिळविला. झोनमध्ये एकूण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले. १ कोटी रुपयांच्या ई-तिकिटांसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर विभागातही १३ गुन्हे दाखल करण्यात येऊन ३५ लाखाची ई-तिकीट आणि संगणक जप्त करण्यात आले. यात १४ लाख ८० हजार ८८४ रुपयांची ई-तिकिटे आणि १९ लाख ७२ हजार ७८३ रुपयांच्या साहित्याचा समावेश आहे.