रेल्वे प्रशासन सज्ज : क्वारंटाईनसाठी अजनी परिसरात १५० खाटा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:01 PM2020-03-30T21:01:07+5:302020-03-30T21:02:01+5:30
कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी अजनी परिसरात १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी अजनी परिसरात १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
उपराजधानीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमितपणे विविध शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक घेऊन रुग्णांची संख्या वाढल्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तयारी केली आहे. रेल्वे प्रशासनाने मागील महिन्यात रेल्वे रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी ४० खाटांचे दोन वॉर्ड तयार केले आहेत. त्यानंतर रविवारपासून अजनी रेल्वे परिसरातील विद्युत लोकोशेड, अजनी बेसिक ट्रेनिंग सेंटर, सी अॅन्ड डब्ल्यू रेस्ट हाऊस, आरपीएफ बरॅक, अजनी वर्कशॉप १५० खाटांची तयारी केली आहे. रेल्वेने येथील परिसर निर्जंतुक करून संशयित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी प्रशासनाला या खाटांची गरज भासल्यास रेल्वे प्रशासन या खाटा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देणार आहे.
क्वारंटाईन सुविधेसाठी रेल्वे सज्ज
‘मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने क्वारंटाईनला ठेवण्यासाठी १५० खाटांची व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासनाला कधीही गरज भासल्यास या खाटा उपलब्ध करून देण्यात येतील.’
एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग