रेल ऑथोरिटीने विनापरवानगी कापली तब्बल दोनशेवर झाडे; मनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 28, 2023 06:54 PM2023-06-28T18:54:28+5:302023-06-28T18:54:36+5:30

यासंदर्भात बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

Railway authority cut over two hundred trees without permission Affidavit of Municipality in High Court | रेल ऑथोरिटीने विनापरवानगी कापली तब्बल दोनशेवर झाडे; मनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

रेल ऑथोरिटीने विनापरवानगी कापली तब्बल दोनशेवर झाडे; मनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

googlenewsNext

नागपूर : रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी व कंत्राटदार की स्टोन इन्फ्रा बिल्ड यांनी अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता तब्बल दोनशेवर झाडे विनापरवानगी कापली, अशी धक्कादायक माहिती महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. यासंदर्भात बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

हा प्रकल्प अंमलात आणताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी स्वच्छ असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, असोसिएशनने या प्रकल्पाकरिता अनेक झाडे अवैधपणे कापली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, यासंदर्भात २२ एप्रिल रोजी महानगरपालिकेला तक्रार सादर केल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेला यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. स्वच्छ असोसिएशनच्या तक्रारीनंतर मनपाच्या उद्यान अधीक्षकांनी प्रकल्प स्थळाचे सर्वेक्षण केले असता एका भागातील ९७ तर, दुसऱ्या भागातील १०० ते १२० झाडे विनापरवानगी कापण्यात आल्याचे आढळून आले, असे मनपाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५४ एकर जमिनीवर विकासकामे केली जाणार आहेत. रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने विकासकामे करण्यासाठी कीस्टोन इन्फ्रा बिल्ड या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदाराने १२ एप्रिल २०२३ रोजी मनपाच्या वृक्ष प्राधिकरणला अर्ज सादर करून केवळ दोन झाडे कापण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे उद्यान अधीक्षकांनी त्यांना १८ एप्रिल रोजी पत्र पाठवून ७६ नवीन झाडे लावण्याचे व त्यांची सात वर्षे देखभाल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ जून रोजी वृक्ष प्राधिकरणने या निर्देशाचे पालन करण्याच्या अटीवर कीस्टोनला दोन झाडे कापण्याची परवानगी दिली होती. इतर झाडे विनापरवानगी कापण्यात आली. सध्या प्रकल्पस्थळी ३५७ झाडे शिल्लक आहेत, असेही मनपाने न्यायालयाला सांगितले.

इमामवाडा पोलिसांनी नोंदविला एफआयआर
अवैधपणे झाडे तोडण्यात आल्यामुळे मनपाने इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी १० मे रोजी संबंधित आरोपींविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्यातील कलम २१ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. याशिवाय, मनपा उद्यान अधीक्षकांनी २५ एप्रिल रोजी रेल ऑथोरिटी व कीस्टोन या दोघांनाही नोटीस बजावली होती. त्यांनी नोटीसला उत्तर सादर करून आरोपांचे खंडन केले, असेही मनपाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Web Title: Railway authority cut over two hundred trees without permission Affidavit of Municipality in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर