नागपुरातील मेट्रोला ८० च्या स्पीडला रेल्वे बोर्डाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 08:01 PM2019-11-13T20:01:50+5:302019-11-13T20:03:22+5:30
मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरीदरम्यान प्रवासाकरिता लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. आता ८० किमी प्रति तास वेगाने मेट्रो गाडी धावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरीदरम्यान प्रवासाकरिता लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. आता ८० किमी प्रति तास वेगाने मेट्रो गाडी धावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे. या संबंधीचे प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाने महामेट्रो नागपूरला प्रदान केले आहे. या प्रमाणपत्रामुळे आता या दोन स्टेशनदरम्यान प्रवासाचा अवधी कमी करण्याची नागपूरकरांची मागणी आता पूर्ण होणार आहे.
या संबंधाने ‘रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’ने (आरडीएसओ) काही दिवसांपूर्वी ऑसिलेशन चाचणी घेतली होती. या चाचणी अंतर्गत ९७० प्रवाशांच्या वजनाएवढी रेतीची सुमारे चार हजार पोती मेट्रो रेल्वेत ठेवली होती. या पोत्यांचे एकत्रित वजन ६३ टन इतके होते. सीताबर्डी-खापरी मार्गिकेवर ही चाचणी घेतली होती
या परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती. ‘आरडीएसओ’ पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते, यातून मिळणारी माहिती संकलित करण्यात आली होती.
या अंतर्गत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशीप इंडेक्स, आपातकालीन ब्रेक व्यवस्थासारख्या मानकांचीदेखील चाचणी करण्यात आली होती. या सर्व मानकांतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून विविध प्रकारच्या चाचण्या आरडीएसओतर्फे करण्यात आल्या होत्या. या नंतर याचा सविस्तर अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला होता. ज्याला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून सीएमआरएसच्या चाचणीनंतर अधिकतम ८० किमी प्रति तास स्पीडने मेट्रो लवकरच धावताना बघायला मिळणार आहे.
सीएमआरएस गुरुवारपासून मेट्रोच्या दौऱ्यावर
वर्धा मार्गावरील(रिच१, ऑरेंज लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी नागपूरला येणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यावर ‘सीएमआरएस’ आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग आणि त्यांचे सहयोगी वर्धा मार्गावरील खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनदम्यान परीक्षण करणार आहेत.