रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम
By नरेश डोंगरे | Published: October 25, 2022 09:41 PM2022-10-25T21:41:56+5:302022-10-25T22:15:19+5:30
नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत, ५० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण
- नरेश डोंगरे
नागपूर : दिवाळीसारखा सण असताना कुटुंबापासून दूर अंधाऱ्या रात्री अविरत परिश्रम घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी अखेर नागपूर - मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत केला. दरम्यान, मालगाडीच्या अपघातामुळे ५० हजार पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांच्या दिवाळीच्या आनंद आणि उत्साहावर पाणी फेरले गेले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वर्धा-बडनेरा मार्गावर रविवारी रात्री ११.२० वाजता मालगाडीला अपघात झाला. मालखेड टिमटाळा स्थानकादरम्यान कोळशाने भरलेले २० डबे रुळावरून घसरले. त्यामुळे नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर हे दोन्ही मार्ग (अप-डाऊन) प्रभावित झाले.
नागपूर ते मुंबई तसेच नागपूर ते पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद, विशाखापट्टनम, चेन्नई, हावडा, पुरी, ओखा, जबलपूर सह विविध शहरात, प्रांतात जाणाऱ्या ६० रेल्वेगाड्यांना ईकडून तिकडे जाण्यास आणि तिकडून ईकडे येण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी यातील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. काही विविध मार्गाने वळविण्यात आल्या. तर काही आहे त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या. दरम्यान, या अपघातामुळे विविध प्रांत आणि शहरातील ५० हजार पेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या आनंद आणि उत्साहावर पाणी फेरले गेले.
आपल्या नातेवाईकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना या प्रवाशांनी आखली होती. त्यासाठी त्यांनी कित्येक दिवसांपूर्वीच रेल्वेचे आरक्षण (रिझर्वेशन) करून ठेवले होते. सरकारी, निमसरकारी आणि खासगी नोकरी करणाऱ्यांनी त्यासाठी सुट्या मंजूर करून घेतल्या होत्या. मात्र, आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या हजारो प्रवाशांना मालगाडीच्या अपघातामुळे मार्ग बंद झाल्याने मध्येच अडकून पडावे लागले. काहींना आपल्या गावाला पोहचण्यासाठी बराच विलंब झाला. अपघाताची माहिती कळताच नागपूर, वर्धा आणि भुसावळ अशा तीन ठिकाणांहून एआर ट्रेन (एक्सीडेंट रेल्वे ट्रेन) घटनास्थळी पोहचल्या. रेल्वेच्या नागपूर विभागाच्या महाव्यवस्थापक रिचा खरे जनसंपर्क अधिकारी विजय थुल अन्य वरिष्ठांसह पोहचले. त्यांनी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.
दोन रात्री, दीड दिवस रेल्वे ट्रॅकवरच- विस्कळीत झालेला नागपूर -मुंबई रेल्वे मार्ग पुर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणांहून सुमारे अडीच ते तीन हजार रेल्वे कर्मचारी, अधिकारी बोलवून घेण्यात आले. ऐन दिवाळीचा दिवस असताना त्यांनी रविवार पूर्ण रात्र, सोमवारचा पूर्ण दिवस आणि रात्र तसेच मंगळवारचा अर्धा दिवस असे सलग ३४ तास अविरत परिश्रम घेतले आणि अखेर मंगळवारी दुपारी नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर हा रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यात आला.
प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, नागपूर-मुंबईसह आठ ठिकाणी मदत केंद्र- या अपघातामुळे लाखो प्रवाशांचे प्रवासाचे गणित गडबडले. रेंज नसल्यामुळे किंवा बॅटरी डाऊन झाल्यामुळे रेल्वेगाड्यातील प्रवासी तसेच त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला. ईकडे रेल्वे प्रशासनाने नागपूर, सीएसएमटी मुंबई, वर्धा, एलटीटी, कल्याण, दादर, ठाणे आणि पनवेल अशा आठ ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत (संपर्क) केंद्र सुरू करण्यात आले.
रेल्वेने घेतली बसची मदत- या अपघातामुळे बडनेरा, धामणगावजवळ अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २० बसेस भाड्याने घेतल्या. या बसमध्ये बसवून वर्धा, पुलगाव, चांदूर, धामणगाव आदी जवळपासच्या ठिकाणी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. अपघातामुळे बडनेरा-अमरावती, वर्धा तसेच आजुबाजुच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. त्या ठिकाणी प्रवाशांना खाण्यापिण्याच्या चिजवस्तू तसेच पाण्याची कमतरता भासू नये किंवा जास्त पैसे घेऊन त्यांची लुट केली जाऊ नये, यासाठीही रेल्वे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरविले.