अजनी यार्डात रेल्वे इंजिन रुळावरून घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:05 AM2021-01-28T01:05:21+5:302021-01-28T01:06:33+5:30
Railway engine derailed नागपूर रेल्वेस्थानकावरून अजनी यार्डकडे आणण्यात येत असलेले प्रवासी रेल्वेगाडीचे शंटिंग इंजिन रेल्वे रुळावरून घसरले. त्यामुळे ओएचई केबल तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूररेल्वेस्थानकावरून अजनी यार्डकडे आणण्यात येत असलेले प्रवासी रेल्वेगाडीचे शंटिंग इंजिन रेल्वे रुळावरून घसरले. त्यामुळे ओएचई केबल तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. परंतु एका तासातच ओएचई केबल दुरुस्त करण्यात आले. रेल्वे इंजिन रुळावर आणण्यासाठी आणि रेल्वे रुळ दुरुस्त करण्यासाठी १२ तास लागले.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंटिंग इंजिन क्रमांक ३६०८१ सकाळी ६.३० वाजता प्रवासी रेल्वेगाडीच्या कोचला अजनी यार्डमध्ये आणत होते. दरम्यान, रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. इंजिनने रेल्वे रुळाजवळ असलेल्या बॅटरी कॅबिनला तोडले. शंटिंग इंजिनचा वेग अधिक असल्यामुळे ही घटना घडली. परंतु सुदैवाने २२ कोचच्या रॅकपैकी एकही कोच रुळाखाली उतरले नाही. माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या काळात रेल्वेगाड्या अधिक नसल्यामुळे वाहतुकीवर फारसा परिणाम पडला नाही. रुळावरून घसरलेले इंजिन १२ तासानंतर सायंकाळी ७.३० वाजता रुळावर आणण्यात यश आले.