रुळावरून उतरले रेल्वे इंजिन : चाचेर स्थानकावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:10 AM2019-02-19T00:10:53+5:302019-02-19T00:12:18+5:30
शंटिंग इंजिन रेल्वे रुळावरून उतरल्याने सोमवारी मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेसेवा प्रभावित झाली. ही घटना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील चाचेर रेल्वे स्थानकावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंटिंग इंजिन रेल्वे रुळावरून उतरल्याने सोमवारी मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेसेवा प्रभावित झाली. ही घटना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील चाचेर रेल्वे स्थानकावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्यावतीने कोळशाने भरलेली मालगाडी सोमवारी चाचेर स्थानकावर पोहचली. सायंकाळी सुमारे ५ वाजून १० मिनिटांच्या दरम्यान चाचेर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १ येथून चाचेर सायडिंगकडे घेऊन जाण्यासाठी या गाडीचे इंजिन काढून ‘शंटिंग’करीत मागे घेऊन जात असताना या इंजिनचे चारही चाक रुळाच्या खाली उतरले. यामुळे ‘मुंबई-हावडा अप-डाऊन लाईन’वर रेल्वे वाहतूक ठप्प पडली. एकीकडे ‘इतवारी-गोंदिया पॅसेंजर’ त्वरित रद्द करण्यात आली, तर दुसरीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसला इतवारी ते गोंदियापर्यंत प्रत्येक स्थानकावर थांबण्याचे आदेश देण्यात आले. यादरम्यान कामठी स्थानकावर हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेसलाही दीड तासापेक्षा अधिक वेळपर्यंत थांबविण्यात आल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाकडून इंजिनला रुळावर आणण्याचे कार्य सुरू झाले होते. वृत्त लिहिपर्यंत मुंबई-हावडा अप लाईन सुरू झाली होती. परंतु ‘डाऊन लाईन’वर रेल्वे वाहतूक ठप्प होती.