खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे गार्डचे नागपुरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:01 PM2019-11-18T23:01:31+5:302019-11-18T23:02:40+5:30
रेल्वेत सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरुद्ध रेल्वे गार्डने आज आपला आवाज बुलंद करीत निदर्शने केली. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलच्या नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार २५० रेल्वे गार्ड आणि लोकोपायलट या आंदोलनात सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरुद्ध रेल्वे गार्डने आज आपला आवाज बुलंद करीत निदर्शने केली. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलच्या नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार २५० रेल्वे गार्ड आणि लोकोपायलट या आंदोलनात सहभागी झाले.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या लोको पायलट लॉबीच्या परिसरात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. के. शुक्ला यांनी केले. शुक्ला यांनी रेल्वेच्या लोकोमोटिव्ह वर्कशॉप, कोच फॅक्टरी, रेल्वेचे संचालनात खाजगीकरण आणि रेल्वेत गुंतवणुकीला चालना देण्याच्या विरोधात तीव्र विरोध दर्शविला. ते म्हणाले, खाजगीकरणामुळे रेल्वे संपणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. परंतु शासनाचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शुक्ल यांनी नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना सुरु करावी, लोको रनिंग स्टाफला देण्यात येणाऱ्या किलोमीटर अलाऊन्सची मोजणी आरएसी फॉर्म्युला १९८० नुसार करावी, रनिंग अलाऊन्सचा आयकर स्लॅब वाढवावा आणि २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या रनिंग स्टाफच्या पेन्शनबाबतच्या समस्यांचा निपटारा करण्याची मागणी केली. आंदोलनात आर. के. राणा, एम. पी. देव, इंद्र राज, पी. बी. बारीक, एम. के. त्रिपाठी, अखिलेश कुमार यांच्यासह लोको रनिंग कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.