रेल्वे मंत्र्यांचा दोन महिन्यात दुसऱ्यांदा टळला रेल्वेस्थानकाचा दाैरा, थेट निघाले दिल्लीला; तर्कवितर्काला उधाण

By नरेश डोंगरे | Published: November 26, 2024 10:18 PM2024-11-26T22:18:52+5:302024-11-26T22:20:56+5:30

दोन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा नागपूर स्थानकावरचा दाैरा, कार्यक्रम रद्द झाल्याने विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. या संबंधाने वारंवार संपर्क करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही...

Railway Minister ashwini vaishnav skips railway station visit for second time in two months, leaves directly for Delhi | रेल्वे मंत्र्यांचा दोन महिन्यात दुसऱ्यांदा टळला रेल्वेस्थानकाचा दाैरा, थेट निघाले दिल्लीला; तर्कवितर्काला उधाण

रेल्वे मंत्र्यांचा दोन महिन्यात दुसऱ्यांदा टळला रेल्वेस्थानकाचा दाैरा, थेट निघाले दिल्लीला; तर्कवितर्काला उधाण

 

नागपूर : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा नागपूर दाैऱ्याचा कार्यक्रम निश्चित होतो. प्रशासन तयारीला लागते. उणिवा, त्रुट्या राहू नये म्हणून झाकझूक करण्यात येते. विविध ठिकाणी चकाकी अन् झळाळी देण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र, काय होते कळायला मार्ग नाही. रेल्वे मंत्र्याचा दाैरा ऐनवेळी रद्द होतो. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. हाईट म्हणजे, यावेळी रेल्वे मंत्री नागपुरात आले, येथे त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधितही केले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रेल्वे स्थानकावर जाण्याऐवजी ते विमानतळाकडे निघाले. त्यामुळे नेमक्या वेळी असे का झाले, असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.

रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयातून २२ नोव्हेंबरला अधिकृत दाैरा पत्रक आले. त्यानुसार, ते २४ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीहून नागपूरला पोहचतील. येथे मुक्काम करतील. २५ नोव्हेंबरला अजनीतील कार्यक्रम आणि नंतर नागपूर रेल्वे स्थानकावर येतील. येथील कार्यक्रमानंतर ते रायपूरला (छत्तीसगड) जातील आणि तेथून ते दिल्लीला पोहचतील, असे त्यात नमूद होते. मात्र, २४ ला रात्री आलेल्या दाैरा कार्यक्रमात ते २५ नोव्हेंबरला सकाळी ९.१५ वाजता नागपुरात येतील आणि येथील कार्यक्रम आटोपून विशेष विमानाने दिल्लीला रवाना होतील, असे नमूद होते. अर्थात, अजनी स्टेडिअममधील अधिवेशनाला संबोधित करणारे रेल्वे मंत्री तेथून पाच मिनिटांसाठी का होईना रेल्वेस्थानकावर येऊन प्रवासी अॅपचे उद्घाटन करतील, असा अंदाज होता. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, रेल्वे मंत्र्यांनी अजनीतील अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रेल्वे स्थानकाऐवजी विमानतळाकडे जाणे पसंत केले. अर्थात रेल्वे स्थानकावरील कार्यक्रम नंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांनी आटोपला. यापूर्वी विजयादशमीच्या दिवशी ते येथे येणार म्हणून जाहिर झाले होते. मात्र, त्याहीवेळी त्यांचा येथील कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाला होता. दोन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा नागपूर स्थानकावरचा दाैरा, कार्यक्रम रद्द झाल्याने विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. या संबंधाने वारंवार संपर्क करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

पंतप्रधानांनी दाखवली होती हिरवी झेंडी
विशेष म्हणजे, देशाच्या सर्व दिशांना जोडणारे रेल्वे स्थानक म्हणून आणि दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर असल्याने एक संवेदनशिल स्थानक म्हणून रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर नागपूर रेल्वे स्थानकाचे नाव आहे. मध्य नागपूर आणि दक्षिण पूर्व मध्य नागपूर असे दोन रेल्वेचे विभागीय मुख्यालयंदेखिल नागपुरात आहे. ब्रिटीश राजवटीपासून तो स्वातंत्र्य मिळाल्यापासून नागपूर रेल्वेे स्थानकावर अनेक महनीय व्यक्ती आलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच रेल्वे स्थानकावरून नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली होती.
 

Web Title: Railway Minister ashwini vaishnav skips railway station visit for second time in two months, leaves directly for Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.