रेल्वे कार्यालय अधीक्षकाने चोरले लोखंड : आरपीएफने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:21 PM2020-06-10T22:21:35+5:302020-06-10T22:23:10+5:30
रेल्वेचे लोखंड चोरी केल्या प्रकरणी एका कार्यालय अधीक्षकालाच रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ५०० किलो लोखंड चोरी केल्यामुळे आरपीएफच्या पथकाने रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेचे लोखंड चोरी केल्या प्रकरणी एका कार्यालय अधीक्षकालाच रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ५०० किलो लोखंड चोरी केल्यामुळे आरपीएफच्या पथकाने रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली.
राजकुमार निखारे असे आरोपीचे नाव आहे. तो अजनी येथे रेल्वे वाहतूक विभागात कार्यरत आहे. ३१ मे रोजी अजनी येथील डीटीआय कार्यालय परिसरातून लोखंडाची चोरी झाली. यानंतर गौसिया कॉलनी, दिघोरी येथील एका भंगार दुकानात त्याने लोखंडाची विक्री केली. लोखंड चोरी झाल्याने आरपीएफ वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आरपीएफला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, शिवराम सिंह, कॉन्स्टेबल लोकेश राऊत यांचे पथक तैनात करण्यात आले. या पथकाने दिघोरी भागात संबंधित भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाच शोध लावला व त्या दुकानाचा मालक प्रवीण गवरे याला ताब्यात घेतले.
प्रवीणचे प्रवीण अॅन्ड ब्रदर्स प्लास्टिक स्क्रॅप सप्लायर्स नावाचे दुकान आहे. चौकशीत सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. मात्र, नंतर रेल्वेचे पाईप खरेदी केल्याचे कबुल केले. त्याच्या दुकानातील रेल्वेच्या मालकीचे असलेले लोखंडी पाईप जप्त करण्यात आले. हे लोखंड अजनी येथे रेल्वेत कार्यरत राजकुमार निखारे याच्याकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्या आधारे निखारे याला अटक करण्यात आली. लोखंड चोरी झालेल्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक सुरेश पेठे (५०) कार्यरत होता. निखारेने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.