रेल्वे अधिकाऱ्यांचे हिंदीवरचे प्रेम पुतनामावशीचे, खरी माया इंग्रजीवरच
By नरेश डोंगरे | Published: June 16, 2023 02:36 PM2023-06-16T14:36:48+5:302023-06-16T14:37:31+5:30
रेल्वेस्थानकावरच्या नवीन स्वच्छतागृहाची प्रेसनोटही इंग्रजीतूनच
नरेश डोंगरे
नागपूर :हिंदी भाषा राष्ट्र भाषा असा गवगवा करणाऱ्या भारतीय रेल्वे प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना हिंदी भाषेचे वावडे असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्या-लिहिण्याचे तर सोडा ते दैनंदिन व्यवहारात हिंदीला बाजुला सारून इंग्रजीवर आपले प्रेम दाखवित आहेत. अलिकडे प्रसिद्धी, प्रचारात आक्रमता दाखविणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी इंग्रजीतील प्रेसनोटचा भडिमार सुरू केला आहे. हे करताना ही मंडळी रेल्वेस्थानकावर नवीन स्वच्छतागृह जनतेच्या सेवेत उपलब्ध करून दिल्याची बातमीही इंग्रजीत पाठवित आहेत.
उन्हाळा जवळपास आता संपण्याच्या मागावर आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात उन्हाळ्याच्या झळा तीव्र असताना रेल्वेने ठिकठिकाणच्या विकास कामाचे कारण पुढे करून अनेकदा अनेक मार्गावरच्या ट्रेन रद्द केल्या. काही ट्रेन वेगळ्या मार्गावरून वळविल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सलग तीन चार महिन्यांपासून प्रवाशांच्या गैरसोयीत भर घालणाऱ्या या प्रकाराला जूनमध्ये ब्रेक बसणार, असा अंदाज होता. मात्र, तो सुरूच आहे. त्यात भर म्हणून विविध मार्गावर धावणाऱ्या ट्रेन तब्बल ९ ते १० तास विलंबाने धावू लागल्या. विलंबाचे कोणतेही समाधानकारक कारण रेल्वे अधिकारी सांगायला तयार नसल्याने प्रवाशांच्या भावना तीव्र होत होत्या.
या संबंधाने रेल्वे प्रशासन खुलासा करण्याच्या प्रयत्नात नसताना तिकडे बालासोर, ओडिशात भयंकर रेल्वे अपघात घडला. त्यानंतर मात्र रेल्वे प्रवाशांची कशी काळजी घेते, प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन कसे कोट्यवधींचा खर्च करीत आहेत, त्याचा बागुलबुवा करण्यासाठी रेल्वे प्रशासन आक्रमक झाले आहे. यासाठी रेल्वेकडून सोशल मिडियावर, पर्सनली मेल करून माहिती पाठविण्याचा सपाटा रेल्वे अधिकाऱ्यांनी लावला आहे. प्रचाराच्या दृष्टीने हा प्रकार चांगला म्हटला तरी अधिकाऱ्यांचे इंग्रजी प्रेम खटकणारे ठरते.
विशेष म्हणजे, हिंदीचा बागुलबूवा करणारे रेल्वे अधिकारी अनेकदा माहिती पाठविताता ती इंग्रजीतच पाठविण्यावर भर देतात. दरदिवशी कोणते ना कोणते माहिती पत्रक (प्रेस नोट) रेल्वे अधिकारी इंग्रजीत पाठवितात. त्यातून त्यांना हिंदी भाषेचे वावडे आहे की इंग्रजीच्या प्रेमात हे अधिकारी हिंदीला बाजुला सारत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे, अनेक पत्रकार वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, जनसंपर्क अधिकाऱ्यांच्याही लक्षात आणून देतात. मात्र, अधिकाऱ्यांचे इंग्रजी प्रेम कमी व्हायला तयार नाही.
तेवढाच आठवडाच फक्त प्रेमासाठी !
रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमात हिंदीचे गोडवे गातात. वर्षातून एकदा हिंदी पखवाडाही साजरा होतो. मात्र, हा आठवडा संपला की अनेक अधिकाऱ्यांचे हिंदी प्रेम आटते आणि नंतर वर्षभर त्यांचे इंग्रजी प्रेम बघायला मिळते.