रेल्वे अधिकाऱ्यांनी वाचला विकासकामांचा पाढा
By नरेश डोंगरे | Published: December 20, 2023 07:24 PM2023-12-20T19:24:07+5:302023-12-20T19:24:07+5:30
रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक
नागपूर: रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या नागपूर विभागाची १६२ वी बैठक बुधवारी नागपुरात पार पडली. या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.
बैठकीला नागपूरचे ब्रजभूषण शुक्ला, दिलीप गौर, कपिल चंद्रायण, सुरेश क. भराडे, सुनील किटे, रामअवतार तोतला, वर्धेचे प्रदीप रवींद्रकुमार बजाज, मिलिंद देशपांडे, रोशन कळमकर (वरुड), अजय कुमार सिन्हा, सौरभ ठाकूर (छिंदवाडा), सीताराम महाते, दीपक सलुजा (बैतूल) भूपेश भलमे, लीलाधर मडावी (हिंगणघाट) उपस्थित होते.
स्वागताच्या औपचारिकतेनंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी समिती सदस्यांच्या सूचनांचा आढावा घेतला. त्यानंतर नागपूर विभागात ठिकठिकाणी झालेल्या विकासकामांचा पाढा वाचण्यात आला. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन २२ नोव्हेंबरपासून नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील स्लीपर कोचची संख्या २ वरून ६ करण्यात आली तर ट्रेन नंबर ०१३१६ बल्लारशाह-वर्धा मेमू ट्रेनच्या वेळेत बदल करून बल्लारशाह वरून सुटण्याची वेळ सायंकाळी ५ ऐवजी ६.३० करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीला आशुतोष श्रीवास्तव (वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक), पी. एस. खैरकर (अतिरिक्त व्यवस्थापक), नवीन पाटील (मुख्य प्रकल्प व्यवस्थापक) आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते. सहायक वाणिज्य व्यवस्थापक रईस हुसेन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वेगवेगळ्या नवीन सुविधा
नागपूर स्थानकावर नवीन उच्च श्रेणीची प्रतीक्षालय बांधण्यात आले. पांढुर्णा स्थानकावर उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून कळमेश्वर स्थानकावर एफओबी आणि बुकिंग कार्यालयासह नवीन स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे. कोहली स्टेशनवर प्लॅटफॉर्म सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले असून बोरखेडी स्टेशनवर ‘कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म’चे काम करण्यात आले आहे. विभागातील नागपूर, बैतूल, किरतगड, टाकू, धारखोह, बरसाली, जौलखेडा आणि हतनापूर स्थानकावर ‘थ्री डी सेल्फी पॉइंट्स’ तयार करण्यात आल्याची माहितीही यावेळी बैठकीत ठेवण्यात आली.