रेल्वे अधिकाऱ्यांनी आपला कार्यालयीन अहवाल हिंदीतच तयार करावा; विभागीय व्यवस्थापकांचे निर्देश
By नरेश डोंगरे | Published: March 19, 2024 07:21 PM2024-03-19T19:21:32+5:302024-03-19T19:22:15+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील राजभाषा कार्यान्वयन समितीची १७८ वी बैठक सोमवारी समाधान कक्षात पार पडली.
नागपूर: रेल्वे अधिकाऱ्यांनी आपले कार्यालयीन दाैरे, ठिकठिकाणचे निरीक्षण आणि त्याचा अहवाल हिंदीतच तयार करावा, असे निर्देश रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील राजभाषा कार्यान्वयन समितीची १७८ वी बैठक सोमवारी समाधान कक्षात पार पडली. या बैठकीला संबोधित करताना अग्रवाल यांनी उपरोक्त निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. रेल्वेशी संबंधित बहुतांश कामकाज हिंदीतून पार पडत असले तरी अनेक अधिकारी अद्यापही इंग्रजीवरचे प्रेम कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा अहवाल नोंदविताना काही कर्मचाऱ्यांकडून तो सदोष नोंदविला जातो.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रभाषा विभागाकडून वेळोवेळी मागण्यात येणारी माहिती त्यांना हिंदीतून उपलब्ध करून देण्यात यावी, असेही निर्देश यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना अग्रवाल यांनी दिले. राष्ट्रभाषेचा जेवढा जास्त प्रचार प्रसार करता येईल तेवढा केला जावा, असा सूर यावेळी बैठकीतील अधिकाऱ्यांतून उमटला. राजभाषा अधिकारी डॉ. शंकर परिहार विभागाचा तिमाही सचित्र अहवाल बैठकीत सादर केला. बैठकीत अप्पर रेल्वे व्यवस्थापक पी. एस. खैरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. मंजूनाथ, वरिष्ठ कार्मिक अधिकारी सांझी जैन, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्यासह अनेक विभाग प्रमूख आणि अधिकारी उपस्थित होते.